पणजी : पर्यटनस्थळे व समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात अनेक लोक मृत्युमुखी पडतात, त्यामुळे गोव्यातील बंदरांवर सेल्फी प्रतिबंधक क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या जीवरक्षक संस्थेने किनारपट्टीवरील २४ ठिकाणी सेल्फी प्रतिबंधक ठिकाणे म्हणून जाहीर केली आहेत. संस्थेने खरेतर आधीच या ठिकाणांवर लाल बावटा लावला असून, संबंधित ठिकाणी पोहण्यास जाऊ नये, अशा पाटय़ा तेथे लावण्यात आल्या आहेत.

बागा नदी, दोना पौला जेट्टी, सिंक्वेरिम फोर्ट, अंजुना, व्हॅगेटर, मोरजिम, अश्वेम, अरंबोल, केरीम, बांबोलिम व सिरीदाव दरम्यानचा भाग या उत्तर गोव्यातील ठिकाणांचा त्यात समावेश आहे. गोव्यात नो  सेल्फी ठिकाणे जाहीर करण्यात आली असल्याची माहिती दृष्टी मरीन या जीवरक्षक संस्थेचे मुख्य कार्यकारी रविशंकर यांनी दिली. दक्षिण गोव्यात अंगोदा, बोगमालो,  बोलांट, बैना, जापनीज गार्डन, बेतुल, कानग्विनिम, पालोलेम, खोला, काबो डे रामा, पोलेम गालगीबाग, तालपोरा, राजबाग ही नो सेल्फी ठिकाणे जाहीर केली असून तेथे तशा पाटय़ा लावण्यात आल्या आहेत. त्यात ध्वज, चित्र इशारेही लावण्यात आले असून आपत्कालीन टोल फ्री नंबर दिले आहेत. गोव्यातील बंदरांना भेट देते वेळी काय करावे व काय करू नये याची माहितीही देण्यात आली आहे. मोसमी पावसाच्या काळात म्हणजे १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सागरात जाऊ नये, पोहण्यास प्रतिबंध असलेल्या ठिकाणी तसे फलक लावण्यात आले असल्याचे शंकर यांनी सांगितले. जीवरक्षक जवान मोसमी पावसाच्या काळात सकाळी साडेसात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम करीत आहेत. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी जीवरक्षक मनोऱ्यावर  दृष्टी संस्थेचे दोन जवान रात्री आठपर्यंत तैनात असतात. सायंकाळी ६ ते मध्यरात्री बारापर्यंत बंदरांवर बंदर सुरक्षा पथकाची गस्त चालू असते.