SIR च्या विरोधात काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हरियाणा दौऱ्या दरम्यान भाषण केलं आणि राहुल गांधींना उत्तर दिलं आहे. राहुल गांधींना पराभव सहन झालेला नाही असंही अमित शाह म्हणाले.

राहुल गांधींना वारंवार झालेला पराभव मान्य नाही-अमित शाह

सलग तिसऱ्यांदा हरियाणातल्या जनतेने भाजपाला संधी दिली. हरियाणानंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होती तिथेही काँग्रेसचा सुपडा साफ झाला. दिल्लीत भाजपा जिंकली. आसाममध्ये जिंकलो. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा सुपडा साफ झाला. या सगळ्या पराभवांमुळे राहुल गांधी बावचळले आहेत. राहुल गांधींना पराभव सहन झालेला नाही त्यामुळे ते आपल्या अपयशाचं खापर निवडणूक आयोगावर आणि SIR वर फोडत आहेत असं अमित शाह म्हणाले.

२०१४ ते २०२४ कुठे SIR होतं तरीही का हरलात?

पुढे अमित शाह म्हणाले, राहुलबाबा २०१४ मध्ये कुठे SIR होतं? तेव्हाही तुमचा सुपडा साफ झाला. २०१९ मध्येही SIR नव्हतं तरीही तुम्ही हरलात. २०२४ मध्येही एसआयआर नव्हतं तरीही तुम्ही हरलात. मी राहुल गांधींना या मंचावरून आव्हान देतो आहे की चर्चा करायची असेल तर मोदींना एक पत्र लिहा. आम्ही एसआयआरवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवू. तुम्ही फक्त खोटं बोलणं सोडून द्या. मी आज देशाला सांगू इच्छितो आहे १३ कोटी नावं छाटली असा आरोप काँग्रेस करते आहे. याचे तपशील सांगतो. २ कोटी ८० लाख नागरिक असे आहेत ज्यांचा मृत्यू झाला. ६ कोटी २५ लाख असे लोक आहेत जे दुसऱ्या राज्यांमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांचं मतदान या ठिकाणी कसं होईल? एक कोटी लोक असे आहेत ज्यांची नावं तीन याद्यांमध्ये होती. त्यातली एकाच यादीत राहिली. जे ३ कोटी उरले आहेत ती नावंच राहुल गांधींना सतवत आहेत. हे लोक निवडणूक आयोगासमोर येत नाहीत, कारण हे तीन कोटी घुसखोर आहेत. घुसखोरांची नावं छाटली आहेत म्हणून राहुल गांधी उर बडवत आहेत.

घुसखोरांना आम्ही मतदार यादीतून हटवणारच-अमित शाह

भाजपाचा संकल्प आहे की आम्ही घुसखोरांना शोधणारा आणि मतदार यादीतून हटवू. त्यानंतर आम्ही त्यांना देशाबाहेरही घालवू हे राहुल गांधी यांनी विसरू नये. इंडिया आघाडीची जे आंदोलन आहे ते घुसखोरांचं रक्षण करण्यासाठी आहे. संविधानाचं रक्षण करण्यासाठी नाही. मोदींचा संकल्प आहे की शोधा, डिलिट करा आणि मतदार यादी स्वच्छ करा आणि डिपोर्ट म्हणजे देशाबाहेर काढा. निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाला BLA ठेवण्याची संमती दिली आहे. निवडणूक आयोग SIR करताना काँग्रेसचे BLA काय करत होते असा सवालही अमित शाह यांनी केला आहे.

राहुल गांधींना प्रश्न आहे की…

राहुल गांधींना माझा प्रश्न आहे जरा त्यांनी सांगावं लग्नाला १० वर्षे झाली असतील तर १२ मुलं होतील का? मतदार यादीत असेही लोक आहेत ज्यात मुलगा वडिलांपेक्षा मोठा आहे. ६०० स्क्वेअर फुटांच्या घरात १३२ लोक राहतात असं होऊ शकतं का? आम्ही अशीच घुसखोरी करणाऱ्यांची तीन कोटी नावं छाटली आहेत. तुमच्या घुसखोर बचाओ रॅलीने काय साध्य होणार नाही असंही अमित शाह म्हणाले. तुम्ही लाखो लोक येतील असं सांगितलं होतं. रामलीला मैदानाची क्षमता ७० हजार आहे. त्यात निम्मे लोकही नव्हेत. दिवस कुठला निवडला तर १ नोव्हेंबरचा. कारण याच दिवशी १९८४ मध्ये काँग्रेसने शिखांचं शिरकाण केलं होतं आणि दंगल उसळली होती अशी टीकाही अमित शाह यांनी केली.