“पक्षाचा पाठिंबा नाही, कुणी फोनही उचलत नाही”; संताप व्यक्त करत भाजपा उमेदवाराची निवडणुकीतून माघार

उमेदवारी दाखल केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, उमेदवाराने आपल्या पक्षाकडून पाठिंबा नसल्यामुळे माघार घेतली.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपा उमेदवार मुमताज अली यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नसल्याचं कारण देत उमेदवारी मागे घेतली आहे. “मला निवडणुकांमधून माघार घ्यायची नव्हती. पण ज्या दिवशी मी माझा उमेदवारी अर्ज भरायला गेले, तेव्हा माझ्या निवडणूक प्रतिनिधीशिवाय पक्षातील कोणीही उपस्थित नव्हते,” असे निराश झालेल्या मुमताज अली यांनी सिंगतले. आगामी कोलकाता महानगरपालिका निवडणुकीसाठी त्या प्रभाग १३४ मधून बंगाल भाजपाच्या उमेदवार होत्या. उमेदवारी दाखल केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, त्यांनी आपल्या पक्षाकडून पाठिंबा नसल्यामुळे माघार घेतली.

आज तक बांगलाला दिलेल्या मुलाखतीत मुमताज अली म्हणाल्या, “आमच्या पक्ष नेतृत्वाने माझ्या फोनला प्रतिसाद दिला नाही. अर्ज छाननीच्या दिवशी मी एकटीच गेले होते. त्यादिवशी तर माझा निवडणूक प्रतिनिधीही गैरहजर होता. जेव्हा मी इतर पक्षांचे उमेदवार त्यांच्या समर्थकांसह येताना पाहिले तेव्हा मला भयंकर वाईट वाटले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी ऑफिसमध्येही शिरले नाही. एका हवालदाराला उमेदवारी अर्ज कसा मागे घ्यावा, असे विचारले. त्यानंतर मी दुपारपर्यंत पक्षाकडून प्रतिसाद येण्याची वाट पाहिली आणि अखेर माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला.”

“बंगालच्या भाजपा नेतृत्वाला आपण निवडणुकीतून माघार घेतली हे माहित नव्हते. माध्यमातून बातमी मिळाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी मला फोन केला. भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख अग्निमित्रा पॉल यांनी मला फोन केला आणि मी‘मुमताज दादा’ घरी आहेत का, अशी विचारणा केली. महिला असूनही त्यांनी दुसऱ्या महिला उमेदवाराला ‘दादा’ म्हटले. त्यांना स्वत:च्या उमेदवारांची कल्पना नाही. त्यामुळे ते आम्हाला किती महत्त्व देतात याची तुम्ही कल्पना करू शकता,” असे म्हणत मुमताज अली यांनी संताप व्यक्त केला.

“त्यांनी मला जाणूनबुजून अशा जागेवर निवडणूक लढवायला पाठवले जिथे मला १० मतेही मिळणार नाहीत. मला खूप असहाय्य वाटतंय. मला मदत करण्यासाठी इथे कोणीही नाही. मी या पक्षात किती काळ टिकू शकेन याची मला खात्री नाही. जो पक्ष मला काम करण्याची संधी देईल, मी त्या पक्षात जाईन”, असे मुमताज म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No support from party bjp candidate withdraws from kolkata civic polls hrc