रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असून अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध टाकत आपली भूमिका जाहीर केली आहे. भारताने मात्र दोन्ही देशांच्या वादात तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीमध्ये बोलताना भारत शांततेचं समर्थन करत असून हे युद्ध संपवण्यासाठी आवाहन केलं आहे. या युद्धात कोणताही देश विजयी होणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीच्या दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांतील व्यावसायिक व सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासह विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही यावेळी उपस्थित होते. यानंतर नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, “रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून आम्ही युद्धविरामासाठी आग्रह करत आहोत. चर्चेनेच वाद मिटवला जाऊ शकत असल्याने आम्ही आवाहन केलं आहे”. “या युद्धात कोणत्याही देशाचा विजय होणार नाही तर प्रत्येकाचा पराभव होणार आहे. यामुळेच आम्ही शांततेच्या बाजूने आहोत,” असंही मोदी म्हणाले.

मोदींशी चर्चा केल्यानंतर जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्त्झ यांनीही युक्रेन प्रश्नावर जर्मनीची भूमिका मांडताना सांगितलं की, “आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना पुन्हा आवाहन करत आहोत की, त्यांनी तेथील निरर्थक नरसंहार थांबवावा. त्यांना आपले सैनिक माघारी बोलवावेत. रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्याचे मुलभूत सिद्धांत पायदळी तुडवले आहेत”.

मोदींचे सोमवारी सकाळी बर्लिनमध्ये आगमन झाले. त्यांच्या या युरोप दौऱ्यादरम्यान ते डेन्मार्क, फ्रान्सचाही दौरा करणार आहेत. युक्रेन संघर्षांमुळे रशियाविरुद्ध अवघे युरोपीय देश एकत्र आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा होत आहे. सोमवारी मोदींचे ओलाफ स्कोल्झ यांनी बर्लिन येथील ‘फेडरल चान्सलरी’च्या प्रासादात स्वागत केले. येथील प्रांगणात त्यांना लष्करी सलामी देण्यात आली. उभय पक्षांच्या शिष्टमंडळांच्या चर्चेआधी दोन्ही नेत्यांत अल्पकाळ चर्चा झाली.

मोदींचा हा पाचवा जर्मनी दौरा आहे. एप्रिल २०१८, जुलै २०१७, मे २०१७ व एप्रिल २०१५ मध्ये मोदींनी जर्मनी दौरे केले होते. डिसेंबर २०२१ मध्ये जर्मन चान्सलरपदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रथमच मोदी त्यांची भेट घेत आहेत.