Gurugram Society Maintenance Defaulters List Banner: सोसायटीचा मेंटेनन्स वेळेवर न भरणाऱ्या सदस्यांकडून वसूली करण्यासाठी कमिटी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवत असते. भारताच्या प्रमुख शहरातील मोठमोठ्या गृहसंकुलांच डोलारा हा सदस्याच्या मेंटेनन्सवर अवलंबून असतो. दर थकबाकी जास्त झाली तर संकुलाची सुरक्षा, स्वच्छता आणि इतर प्रश्न गंभीर होतात. गुरुग्राममधील एका उच्चभ्रू सोसायटीत थकबाकी न देणाऱ्या सदस्यांना कमिटीने अजब धडा शिकवला. मेंटेनन्स न भरणाऱ्या सदस्यांचे घरबसल्या जेवण मागविण्याचा प्रकार कमिटीने थांबवला. ज्यांची मोठी थकबाकी आहे त्यांच्या घरी झोमॅटो, स्विगी आणि मदतनिसांना सोडण्यात येत नाही आहे.
गुरुग्रामच्या उप्पल साउथेंड सोसायटीत सदर प्रकार घडला आहे. सोसायटीच्या मुख्य दारावर एक मोठा बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर सदस्यांची नावे आणि पुढे त्यांची थकबाकी नमूद केली आहे. या उच्चभ्रू सोसायटीतील घरांच्या किमती दोन कोटी रुपयांच्या घरात आहेत.
कमिटीने मुख्य दारावर लावलेल्या मोठ्या बॅनरवर सदस्यांचे फ्लॅट क्र, नावे आणि थकबाकीची रक्कम कधीपासून ते किती रुपये बाकी आहे, याचा तपशील दिला आहे. त्याच्याखाली लिहिलेल्या संदेशात म्हटले, “थकबाकी असलेल्या सदस्यांच्या घरी झोमॅटो, स्विगी, मदतनीस सेवा, कार वॉशिंग अशा अत्यावश्यक नसलेल्या सेवा पूर्णपणे बंद करण्यात येत आहेत.” आणखी एक मेसेज होता. त्यात लिहिले होते, ज्यांची थकबाकी देणे बाकी आहे, असा सदस्यांनी लवकरात ती अदा करावी.
बॅनरच्या खाली आणखी एक सूचना लिहिली होती. ज्यात म्हटले की, जे लोकांचा मेंटेनन्स बाकी आहे. त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार नाही. कमिटीने म्हटले की, काही सदस्यांनी अनेक वर्षांपासून मेंटेनन्स भरलेला नाही. काहींनी २०१२ तर काहींनी २००९ पासून मेंटेनन्स भरलेला नाही. त्यांची थकबाकी १ लाख रुपयांच्याही वर गेली आहे.
कमिटीने ही शक्कल लढविल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच या बॅनरचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. सोसायटीत प्रवेश करताना अनेक लोक थोडे थांबून यादीवर नजर टाकत आहेत. तर काही जण गाडी चालवता चालवता बॅनरवर नजर टाकत होते.
कमिटीचे अध्यक्ष कर्नल सुरेंद्र कुमार यादव यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आम्ही अशाच प्रकारची युक्ती २०२३ मध्येही राबवली होती. तेव्हाही आम्ही लाखो रुपयांचा मेंटेनन्स गोळा केला होता. यावेळीही थकबाकी खूपच वाढली आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा हीच कल्पना राबवावी लागली. याला कोणत्याही सदस्याचा विरोध नाही. त्यांनी मेंटेनन्स वेळेवर भरावा, एवढीच त्यामागची भावना आहे.
