भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांच्याविरुद्ध इराणने मृत्युदंडाचा फतवा (डेथ वॉरंट) जारी केल्यानंतर २७ वर्षांनी, साहित्यासाठी नोबेल विजेत्यांची निवड करणाऱ्या स्वीडिश अ‍ॅकॅडमीने या फतव्याचा निषेध केला आहे.
‘दि सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकात रश्दी यांनी इस्लामची कथितरीत्या निंदा केल्याबद्दल इराणचे नेते अयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्याविरुद्ध १९८९ साली मृत्युदंडाचा फतवा काढला होता. या कृत्याचा निषेध करण्यास स्वीडिश अ‍ॅकॅडमीने नकार दिल्यामुळे तिच्या दोन सदस्यांनी तेव्हाच राजीनामा दिला होता. राजकीय सहभागाबाबतच्या आपल्या आचारसंहितेच्या आधारे अ‍ॅकॅडमीने अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणार्थ एक निवेदन जारी केले, तरी रश्दी यांना उघडपणे पाठिंबा दिला नव्हता.
मात्र, अशा प्रकारचा फतवा आणि रश्दींच्या हत्येसाठी इनाम जाहीर करणे हा ‘आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडउघड उल्लंघन’ असल्याचे सांगून गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर जारी केलेल्या निवेदनात अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा या फतव्याचा निषेध केला.
आपले मन का बदलले याचे नेमके कारण अ‍ॅकॅडमीने दिले नाही, तथापि इनामाची रक्कम ६ लाख यूएस डॉलर्सने वाढवण्याबाबत इराणच्या सरकारतर्फे संचालित प्रसारमाध्यमातील वृत्तांचा हवाला दिला.