scorecardresearch

रासायनिक अस्त्रे नियंत्रक संस्थेला शांततेचे नोबेल

संयुक्त राष्ट्रांच्या रासायनिक अस्त्रे प्रतिबंधक संस्थेला (ओपीसीडब्ल्यू) यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

रासायनिक अस्त्रे नियंत्रक संस्थेला शांततेचे नोबेल

संयुक्त राष्ट्रांच्या रासायनिक अस्त्रे प्रतिबंधक संस्थेला (ओपीसीडब्ल्यू) यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सीरियातील यादवी युद्धात रासायनिक अस्त्रांच्या वापरात किमान १३०० लोक मरण पावल्याने ही अस्त्रे नष्ट करण्याच्या मुद्दय़ाला महत्त्व प्राप्त झाले होते. हा पुरस्कार तालिबानी हल्ल्यातून वाचलेली शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिला दिला जाईल अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. तिच्या नावावर सट्टाही लागला होता, पण प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेची निवड जाहीर करण्यात आली. ‘ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स’ (ओपीसीडब्ल्यू) संस्थेने रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याच्या कामात केलेल्या कामगिरीमुळे तिची निवड नोबेलसाठी करण्यात आली आहे, असे नोबेल समितीचे अध्यक्ष थोरबजोर्न जगलँड यांनी सांगितले. लागोपाठ दुसऱ्या वर्षी एखाद्या संस्थेला नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. गेल्या वर्षी तो युरोपीय महासंघाला देण्यात आला होता.
ओपीसीडब्ल्यू या संस्थेची स्थापना हेग येथे १९९७ मध्ये रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याच्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी केली होती. हा जाहीरनामा १३ जानेवारी १९९३ रोजी करण्यात आला होता. अगदी अलीकडे फारशी चर्चेत नसलेली ही संस्था सीरियाने त्यांच्या दमास्कस या राजधानीच्या ठिकाणी आसपासच्या प्रदेशात रासायनिक अस्त्रांचा वापर विरोधकांवर केल्याने प्रकाशझोतात आली होती, कारण रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याची गरज आणखी वाढली होती. २०१४च्या मध्यापर्यंत सीरियाने ही अस्त्रे नष्ट करावीत, असा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-10-2013 at 02:49 IST

संबंधित बातम्या