गेल्या आठवडा भरापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. नोबेल समितीकडून आज शेवटच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, सन २०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर झाला आहे.

मिलग्रोम आणि विल्सन यांना हा पुरस्कार लिलावाचा सिद्धांतात सुधारणा आणि नव्या पद्धतींच्या शोधांसाठी देण्यात आला आहे. हे दोघेही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाची नवी प्रक्रिया तयारी केली ज्या पारंपारिक पद्धतीने विकणे कठीण आहे. या पद्धतीच्या शोधामुळे जगभरातील विक्रेते, खरेदीदार आणि करदात्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.

काय आहे ‘हा’ लिलावाचा सिद्धांत?

ऑक्शन थेअरी किंवा लिलावाच्या सिद्धांताचा वापर करीत एखादी वस्तू विकत घेणारा बोली लावताना आणि अंतिम किंमत ठरवताना विविध नियमांना समजणून घेण्याचा प्रयत्न करतो. याबाबतचे विश्लेषण कठीण असते कारण उपलब्ध माहितीच्या आधारे बोली लावणारे रणनीती आखून व्यवहार करतात. ते दोन्ही बाजू लक्षात घेऊन स्वतःला त्या वस्तूची किती माहिती आहे आणि बोली लावणाऱ्याला याची किती माहिती आहे, याचा अंदाज घेतात.