एपी, स्टॉकहोम
मेंदूमधील चेतातंतू सक्रिय अथवा बंद करण्याची यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते, यावर संशोधन करणार्या तीन शास्त्रज्ञांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. कार्ल डायसेरोथ (वय ५४), पीटर हेगेमन (वय ७१) आणि जॉर्ज नागेल (वय ७३) अशी या तीन शास्त्रज्ञांची नावे आहेत.
या शास्त्रज्ञांनी ‘लाइट गेटेड आयन चॅनल’ आणि ‘ऑप्टोजेनेटिक्स’ यावर संशोधन केले. मेंदूमधील गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधलेली पद्धत आता जगभर वापरली जात असल्याची टिप्पणी नोबेल पुरस्काराची निवड करणार्या समितीने केली आहे.
डायसेरोथ हे कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात आहेत, तर हेगेमन बर्लिनमधील हम्बोल्ट विद्यापीठात आणि नागेल हेदेखील जर्मनीतील वुर्झबर्ग विद्यापीठात कार्यरत आहेत. ‘ऑप्टोजेनेटिक्स’मुळे मज्जाशास्त्र (न्यूरोसायन्स) क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे, असे नोबेल समितीने नमूद केले.
हेगेमन यांनी एकपेशीय हिरव्या शैवालाचे कण प्रकाशाच्या दिशेने कसे जातात याचा शोध घेतला. हेगेमन आणि नागेल यांनी एका विशिष्ट प्रथिनाचा शोध लावला. डायसेरोथ यांनी या प्रथिनावर नियंत्रण ठेवणार्या जनुकावर संशोधन केले. उंदराच्या मेंदूमधील चेतातंतूसाठी प्रकाशनियंत्रित कळ तयार करण्यासाठी हे संशोधन केले.
नोबेल सप्ताहाला सुरुवात
स्टॉकहोममध्ये सोमवारी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्याच्या सप्ताहाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी तिघांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले. यापाठोपाठ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि साहित्य या क्षेत्राचे पुरस्कार जाहीर केले जातील.
