सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे, तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. १२ ऑक्टोबरला राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा जो मोर्चा निघाला त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. तसंच एक लक्षात ठेवा तुम्ही न्यायपालिकांवर दबाव आणू शकत नाही, आम्ही काही वेगळ्या जगात राहात नाही, आम्हालाही वास्तव काय आहे याची कल्पना आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

राहुल गांधींच्या याचिकेची सर्वोच्च न्यायलायकडून दखल

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या याचिकेची दखल घेतली आहे. या याचिकेवरून कोर्टाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली आहे. दरम्यान राहुल गांधींच्या कोर्ट परिसरातल्या वर्तणुकीवरही कोर्टाने स्पष्टीकरण मागितलं आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या परिसरात समर्थकांसह राहुल गांधी आंदोलन करण्यासाठी गेले होते त्यावर स्पष्टीकरण द्या, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. कोर्टाला कोणीही धमकावू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. यावेळी राहुल गांधींच्या नेतृत्वात एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. एक बाहुला हाती घेऊन राहुल गांधींनी आंदोलन केलं होतं. यावरूनच सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत.

सरन्यायाधीश सूर्य कांत काय म्हणाले?

भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले एक लक्षात ठेवा न्यायपालिकांना कुणीही धमक्या देऊ शकत नाही किंवा त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही. कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींची बाजू न्यायालयात मांडली. त्यांना न्यायालयाने सांगितलं की आंदोलनाच्या वेळी राहुल गांधी जे वागले आहेत, जे वर्तन त्यांनी केलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागेल. १२ ऑक्टोबरला राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या खासदारांचा आणि नेत्यांचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयावर गेला होता. SIR मधल्या कथित अनियमितता आणि व्होटचोरीचा मुद्दा उपस्थित करत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेत राहुल गांधींतर्फे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसंच SIR प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. या याचिकेची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितलं आहे आणि त्यांना तशी नोटीसही बजावली आहे. मात्र राहुल गांधी यांनाही खडे बोल सुनावले आहेत. आता यावर काँग्रेसकडून काय उत्तर दिलं जाणार किंवा राहुल गांधी काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.