मुंबई : सुमारे १५८ वर्षे जुन्या टाटा समूहाची प्रमुख नियंत्रक कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळाने गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणखी पाच वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याच्या बाजूने मतदान केले. मात्र, समूहाची बहुतांश मालकी राखणार्‍या टाटा न्यासांनी या निर्णयाला विरोध करत तो अवैध ठरविला. ज्यामुळे या प्रतिष्ठित उद्योग समूहात वर्षभरापासून धुमसत असलेला नेतृत्वाचा वाद अधिकच तीव्र झाला आहे.

जवळपास तीन तास चाललेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नाट्यमय घडामोड घडली आणि गेल्या महिन्यात अध्यक्षपदासाठी तिसर्‍या कार्यकाळासाठी अनिच्छा दर्शवत पायउतार होत असल्याची घोषणा करणार्‍या चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीच्या निर्णयावर पोहचत ती आटोपली. बैठकीपश्चात टाटा सन्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, चंद्रशेखरन यांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या संचालक मंडळाच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानंतर, त्यांच्या सध्याच्या कार्यकाळाच्या समाप्तीनंतर त्यांना आणखी पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्त करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.

चंद्रशेखरन हे २०१७ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष झाले होते आणि २०२२ मध्ये त्यांची दुसर्‍यांदा पाच वर्षांच्या मुदतीसाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली, जी फेब्रुवारी २०२७ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर अध्यक्ष म्हणून तिसर्‍या मुदतवाढीस चंद्रशेखरन हे इच्छुक नसल्याचे त्यांनी गेल्या महिन्यात जाहीर केले होते. आता पुन्हा त्यांच्या फेरनियुक्तीच्या ताज्या निर्णयांवर वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम शिक्कामोर्तब होईल. गणपूर्तीअभावी ही सर्वसाधारण सभा होऊ शकली नव्हती.

फेरनियुक्ती अवैध; टाटा ट्रस्टचा दावा

संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा न्यासांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ६८ वर्षीय नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला तसेच टाटा सन्सच्या संभाव्य ‘आयपीओ’ला विरोध दर्शविला. टाटा सन्समध्ये ६६ टक्के मालकी असणार्‍या आणि नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखालील ‘टाटा ट्रस्ट्स’ आणि अध्यक्ष चंद्रशेखरन यांच्यामध्ये टाटा सन्सचा संभाव्य आयपीओ, एअर इंडियाचा वाढता तोटा आणि अल्पसंख्याक भागधारकाच्या बाहेर पडण्याच्या मुद्यावरून मतभेद सुरू आहेत. ही फेरनेमणूक अवैध असून नियमांनुसार अध्यक्षपदाच्या कोणत्याही ठरावाला न्यासांनी नामांकित केलेल्या दोन्ही संचालकांची मंजुरी असणे आवश्यक आहे, असे ‘टाटा ट्रस्ट्स’ने निवेदनात म्हटले आहे. नोएल टाटा यांनी या विरोधात मतदान केल्यामुळे, हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या रद्दबातल आणि निराधार ठरला आहे. तिसर्‍यांदा अध्यक्षपद नाकारणार्‍या चंद्रशेखरन यांनी १२ ऑगस्ट रोजी घेतलेला निर्णय स्वीकारण्यात येऊन तो अंतिम झाला होता, तसेच कंपनीच्या नियमावलीनुसार उत्तराधिकारी शोधण्यासाठी निवड समिती स्थापन करण्यासाठी टाटा सन्सला सांगण्यात आले होते, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले.

समभागांत तेजी

चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यामुळे एअर इंडियाचा वाढता तोटा, जॅग्वार लँड रोव्हरमधील मंदी आणि विदा गळतीच्या समस्येचा सामना करणार्‍या टाटा समूहाला मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे टाटा कंपन्यांच्या समभागांत तेजी पाहायला मिळाली. टाटा सन्सच्या ‘आयपीओ’च्या हालचालींमुळे टाटा केमिकल्स जवळपास ७ टक्क्यांनी वधारला. बरोबरीने टाटा इन्व्हेस्टमेंट, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टीसीएससह समूहातील बहुतांश समभाग तेजीत बंद झाले.

समभाग सूचिबद्धतेसाठी सकारात्मकता?

उल्लेखनीय म्हणजे टाटा सन्सचे खासगीपण संपुष्टात आणून, तिचे समभाग बाजारात सूचिबद्ध करण्याबाबत बैठकीने सकारात्मकता दर्शवली असे संकेत आहेत.

रिझर्व्ह बँकेने २०२२ मध्ये टाटा सन्सचे ‘उच्चस्तरीय बँकेतर वित्तीय कंपनी’ (अप्पर-लेयर एनबीएफसी) म्हणून वर्गीकरण केले आहे.

त्याअनुषंगाने कठोर नियमांनुसार, कंपनीला ‘आयपीओ’ आणणे बंधनकारक असून, या नियमातून सूट मिळावी ही टाटा सन्सची विनंती रिझर्व्ह बँकेने फेटाळल्याच्या काही दिवसांतच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मात्र टाटा सन्सने थेटपणे ‘आयपीओ’ची घोषणा करणे टाळले असून, ‘आम्ही लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पावले उचलू आणि अनुपालनाबाबत रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट्स व इतर भागधारकांचे मार्गदर्शन घेऊ,’ असे म्हटले आहे.