Noelia Castillo Ramos Euthanasia: एक्स बॉयफ्रेन्ड आणि त्यानंतर इतर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिने स्वत:चे आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या या प्रयत्नातून ती बचावली खरी पण, कमरेखाली तिला कायमचा अर्धांगवायू झाला. लैंगिक अत्याचारामुळे मानसिक त्रास आणि अर्धांगवायूमुळे शारीरिक त्रासाचा सामना करणाऱ्या २५ वर्षीय नोएलियाचा गुरुवारी मृत्यू झाला. स्पेनमधील बार्सिलोना येथे राहणाऱ्या नोएलिया कॅस्टिलो रामोसने इच्छामरणासाठी अर्ज केला होता, न्यायालयाने तिची मागणी मान्य केल्यानंतर गुरुवारी तिने जगाचा निरोप घेतला.
नोएलिया कॅस्टिलो रामोसचा इच्छामरणासाठी अर्ज
२५ वर्षीय नोएलिया कॅस्टिलो रामोसवर पहिल्यांदा तिच्या एक्स बॉयफ्रेन्ड आणि दुसऱ्यांदा तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करणाऱ्या नोएलियाने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली पण, तिला कमरेखाली कायमचा अर्धांगवायू झाला. मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करणाऱ्या नोएलियाने १८ महिन्यांपूर्वी इच्छामरणासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
वडिलांचा विरोध
नोएलियाच्या इच्छा मरणाला वडिलांनी कडाडून विरोध दर्शवला. यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेत मुलगी नोएलियाच्या इच्छामरणाला मान्यता देऊ नये अशी मागणी केली. प्रकरण स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले पण, न्यायालयाने नोएलियाची मागणी तिच्या अधिकारांना धरुन असल्याचे सांगत इच्छामरणाला परवानगी दिली.
मरणापूर्वी केले १६ श्रुंगार
आता अजून वेदना नाही सहन करु शकत, कुटुंबियांच्या आनंदापेक्षा मला माझे आयुष्य आणि त्याचा शेवट महत्वाचा वाटतो, असे अखेरच्या क्षणी नोएलिया म्हणाली. पण, मला सुंदर दिसत मरणाला कवटाळायचे आहे, अशी अखेरची इच्छा नोएलियाने व्यक्त केली. नोएलियाने आयुष्याच्या अंतिम यात्रेला निघण्यापूर्वी तिच्या आवडीचा ड्रेस घातला, थोडा मेकअप केला आणि काही खास फोटो जवळ ठेवले होते. स्पेनमध्ये २०२१ मध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली.
