चायनीज मोबाईल कंपनी ओप्पोच्या एका चिनी कर्मचाऱ्याने भारतीय ध्वज फाडून तो कचराकुंडीत फेकल्याचा आरोप कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ओप्पोच्या नोएडामधील कार्यालयात मोठा गदारोळ झाला आहे. यानंतर परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले असून त्यांनी ओप्पो कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाचा कंपनीच्या चिनी अधिकाऱ्याने अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र यावर अद्याप ओप्पो कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ओप्पो कंपनीच्या चिनी अधिकाऱ्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यामुळे नोएडातील ओप्पो कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. जमावाने तिरंगा फडकावत ओप्पो कंपनीच्या विरोधात घोषणा दिल्या. या वर्षाच्या सुरुवातीला अॅमेझॉनच्या कॅनडासाठीच्या संकेतस्थळावर भारतीय ध्वजाच्या रंगाची पायपुसणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी परराष्ट्रमंत्री सुराज स्वराज यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली होती. भारतीय ध्वजाच्या रंगाची पायपुसणी त्वरित संकेतस्थळावरुन हटवली जावी, असे सुराज स्वराज यांनी म्हटले होते. ‘पायपुसणी हटवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ असा इशाराच स्वराज यांनी दिली होता. त्यामुळे अॅमेझॉनने संबंधित पायपुसणी संकेतस्थळावरुन हटवली होती. यासोबतच अॅमेझॉनने या प्रकरणी भारताची बिनशर्त माफीदेखील मागितली होती.

नवी मुंबईत राहणाऱ्या अतुल भोबे यांनी अॅमेझॉनवर भारतीय ध्वजाच्या रंगाची पायपुसणी विक्रीसाठी ठेवण्यात आली असल्याचा स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे अखेर अॅमेझॉने नरमाईची भूमिका घेतली. यानंतर अॅमेझॉनवर भारतीय ध्वजाचे रंग असलेले शूजचे किचेन आणि महात्मा गांधींचे छायाचित्र असलेल्या चपला विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्रकारदेखील समोर आले होते.