‘व्हॅलेंटाईन्स डे’ दिवशीच त्याने तिला संपविले आणि स्वतःला गोळी घातली. नोएडाच्या सेक्टर १०७ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या परिसरात एका बंद कारमध्ये ३२ वर्षीय तरुण आणि २६ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. सेक्टर ३९ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिलर क्रमांक ८४ जवळ दादरी रोडवर एक संशयास्पदरित्या पार्क केलेली कार आढळून आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे पोलीस अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कडेला पार्क केलेली गाडी आढळली. त्या गाडीत दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
गाडी आतून लॉक होती
पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर तरुण आणि तरुणी कारमध्ये मृत अवस्थेत आढळले. कार आतून लॉक केलेली होती. दोघांच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. तरुणाच्या हातात एक पिस्तूल सापडले. ज्यावरून तपास करणाऱ्या पोलिसांना प्राथमिक माहितीत हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय आला.
गोळी घालून आत्महत्या!
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्या तरुणाने तरुणीवर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याचा संशय आहे. मृतांची ओळख पटली आहे. तरुण हा दिल्लीतील त्रिलोकपुरी येथील असून त्याचे नाव सुमित (वय- ३२) आहे. तर तरुणी ही नोएडातील सेक्टर १०१ मधील सालारपूर येथील रहिवासी आहे. तिचे नाव रेखा (वय- २६) आहे. दोघांच्या कुटुंबियांना पोलिसांनी घटनेची माहिती दिली आहे.
मृत्यूचे नेमके कारण काय?
वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मृतदेहांच्या भोवतीच्या परिस्थितीची तपासणी केली. या घटनेत मृत्यूचे नेमके कारण आणि घटनांचा क्रम निश्चित करण्यासाठी चौकशी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्या असल्याचे समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, घटना घडलेल्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था सामान्य राहिली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि तपासकर्ते मृतांमधील संबंध आणि घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या घटनांसह सर्व संभाव्य बाजू तपासत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. मृत्य व्यक्तींमधील परस्पर संबंध आणि घटनेचा क्रम, घटनेमागील संभाव्य कारणे जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

