नोएडामध्ये एका १६ वर्षीय मुलाने झोपेत असलेल्या वडिलांची हत्या केल्यानंतर मेट्रोसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेत वडिलांचा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या घरात सापडला, तर मुलाचा मृत्यू सेक्टर ५२ मेट्रो स्थानकावर झाला. याबद्दल सविस्तर वृत्त टाइम्स नावने दिले आहे.
वडिलांच्या झोपेत हत्या केल्याचा संशय
पोलिसांच्या तपासानुसार, मुलगा आणि त्याचे वडील राजू शर्मा जे ट्यूटर म्हणून काम करत होते, गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून नोएडातील गढी चौखंडी गावातील भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांना संशय आहे की, मुलाने बुधवारी पहाटे वडील झोपेत असताना त्यांची हत्या केली. त्यानंतर तो घरातून बाहेर पडून सेक्टर ५२ मेट्रो स्थानकावर पोहोचला.
पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने धावत्या मेट्रोसमोर उडी घेतली. या घटनेची माहिती Dial-११२ द्वारे सेक्टर ४९ पोलिसांना मिळाली. मेट्रो कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुलाची ओळख पटली
तपासादरम्यान मृत मुलाची ओळख राजू शर्मा यांचा १६ वर्षीय मुलगा म्हणून झाली. तो नोएडातील सेक्टर ७३ येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर मृतदेह त्याच्या आई आणि मामाकडे सोपवण्यात आला.
वडिलांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला
दरम्यान, राजू शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सुरुवातीला माहिती नव्हते. राजू यांचा भाऊ अरुण आपल्या भावाचा शोध घेत होता. त्याने पर्थला आणि गढी चौखंडी येथील पोलिस चौक्यांमध्ये जाऊन मदत मागितली.
गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांना एका भाड्याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस अरुणबरोबर तिकोना पार्कजवळील त्या घरात पोहोचले. दरवाजा उघडल्यानंतर राजू शर्मा यांचा मृतदेह आत आढळला. पंचनामा आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
आईपासून वडिलांचे वेगळे राहणे
पोलिसांच्या तपासात मुलगा आपल्या वडिलांच्या कठोर वागणुकीमुळे नाराज असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याची आई कोविड-१९ महामारीनंतर राजू यांच्यापासून वेगळी राहत असल्याचेही समोर आले आहे. आईच्या अनुपस्थितीमुळे आणि वडिलांशी असलेल्या तणावामुळे मुलाच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता का? याचा तपास केला जात आहे.
दोन्ही मृत्यूंचा तपास सुरू
एका बाजूला मुलाचा मेट्रोसमोर उडी घेतल्याने मृत्यू झाला, तर दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी वडिलांचा मृतदेह घरात आढळला. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस आता राजू शर्मा यांच्या मृत्यूचे नेमके कारण, हत्येची परिस्थिती आणि मुलाच्या आत्महत्येमागील कारणे यांचा तपास करत आहेत.
