Newlywed woman was burnt alive by her in-laws : ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच एका २२ वर्षीय तरुणीचा भाजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या वादातून तिची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका शेजाऱ्याला अटक केली असून पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्या पती आणि सासरच्या मंडळींवर तिला मारहाण करून तिची हत्या केल्याचा आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मोनिका नागर हिने अनुज चौहानसोबत १७ फेब्रुवारी रोजी प्रेमविवाह केला. या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला घरच्यांचीही संमती होती. लग्नापूर्वी मोनिका तिच्या आईबरोबर एका भाड्याच्या घरात राहत होती. दरम्यान, मोनिकाने तिच्या भावाला सांगितलं होतं की तिचा नवरा आणि सासरचे लोक तिला मारहाण करतात. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार मोनिकाला लग्नानंतर फसवण्यात आले. तिच्या नावावर असलेली संपत्ती नवऱ्याच्या नावावर करून देण्याकरता तिच्यामागे तगादा लावण्यात आला दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना, मोनिकाचे नातेवाईक अनिल यांनी आरोप केला की, लग्नानंतर दोन महिन्यांच्या आतच छळ सुरू झाला होता. “त्यांनी पैशांसाठी तिच्याशी लग्न केले. तिच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता होती आणि ती हस्तांतरित करून घेण्यासाठी ते तिचा सतत छळ करत राहिले,” असा दावा त्यांनी केला.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोनिकाने तिच्या आईला फोन केला. फोन आल्यानंतर तिची आई तत्काळ मोनिकाच्या सासरी जायला निघाली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिथे ती पोहोचली. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ती पोहोचली तेव्हा मोनिकाच्या घराबाहेर मोठा जमाव जमला होता. “त्या जमावात, माझ्या आईने अनुजला मोनिकाचा मृतदेह एका गाडीत ठेवताना पाहिले”, असा आरोप अनिलने केला. त्याने दावा केला की, कुटुंबीयांनी त्या गाडीचा पाठलाग करत एका रुग्णालयापर्यंत गेले, जिथे डॉक्टरांनी मोनिकाला मृत घोषित केले. “जेव्हा माझ्या आईने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेले,” असे तो म्हणाला.
पोलिसांनी मोनिकाचा पती अनुज, शेजारी कन्नू आणि इतर अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण उघड झाले नाही, त्यानंतर पुढील तपासणीसाठी अवयव जतन करून ठेवण्यात आले. दादरीचे एसएचओ जितेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, तपासादरम्यान शनिवारी कन्नूला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, कन्नू एका निर्जन भूखंडावर गेला होता, जिथे अनुज मोनिकाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करत होता, असे त्यांना आढळून आले.
आईने न्यायाची मागणी केली.
“खून का बदला खून. मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, त्यांनी मारेकऱ्यांना चकमकीत ठार करावे. तरच मला न्याय मिळेल”, अशी मागणी मोनिकाच्या आईने केली.
