Noida International Airport Renamed Narendra Modi Airport : उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे असलेला हा विमानतळ राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांचा आणि हवाई वाहतुकीचा ताण कमी करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

पहिल्या टप्प्यात वर्षाला १.२ कोटी प्रवाशांची क्षमता

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात एक धावपट्टी आणि प्रवासी टर्मिनल उभारण्यात आले आहे. या टप्प्यातून वर्षाला सुमारे १.२ कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता नियोजित आहे. भविष्यात अनेक धावपट्ट्यांचा विस्तार करून २०५० पर्यंत विमानतळाची क्षमता वर्षाला सुमारे ७ कोटी प्रवाशांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे.

झ्युरिक विमानतळाच्या कंपनीचा सहभाग

हा ग्रीनफिल्ड विमानतळ सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित करण्यात आला आहे. ‘झ्युरिक एअरपोर्ट इंटरनॅशनल एजी’ची उपकंपनी ‘यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि उत्तर प्रदेश सरकारच्या संबंधित यंत्रणा या प्रकल्पात सहभागी आहेत. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि एनसीआर परिसरातील विमान वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी या विमानतळाची रचना करण्यात आली असून, तो यमुना एक्सप्रेसवे आणि मल्टि-मोडल ट्रान्जिट लिंक्सशी जोडलेला आहे.

पुढील टप्प्याचा विस्तार २०३१-३२ पर्यंत अपेक्षित

विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन २८ मार्च २०२६ रोजी करण्यात आले होते. दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये व्यावसायिक विमानसेवा सुरू झाली. विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करून तो २०३१-३२ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.