Valentine’s Horror in Noida : प्रेमाचा सण ज्या दिवशी साजरा करतात त्याच दिवशी एका जोडप्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीतून समोर येत आहे. दिल्लीतील सेक्टर १०७ मध्ये पार्क केलेल्य कारमध्ये या जोडप्याचे मृतदेह सापडले. सुरुवातीला या दोघांनीही आत्महत्या केली असावी, असा संशय होता. मात्र, त्यानंतर प्रेयसीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याचं समोर आलं. दरम्यान, आता प्रियकराने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, या दोघांचे मृतदेह बंद गाडीत सापडले. शनिवारी सकाळी सेक्टर ३९ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादरी रोडवरील पिलर क्रमांक ८४ जवळ ही कार पार्क केली होती. या कारमध्ये या जोडप्याचे मृतदेह सापडले. या दोघांच्याही डोक्यात गोळी घातल्याच्या खुना होत्या.
गाडी आतून होती लॉक
मुलाच्या हातात एक पिस्तुल सापडले असून गाडी आतून लॉक होती. प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे दिसतंय, असं अतिरिक्त पोलीस उपायुक्त मनीषा सिंह यांनी पीटीआयला सांगितलं. प्राथमिक तपासानुसार, त्या व्यक्तीे प्रथम मुलीवर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर पिस्तूल फिरवून आत्महत्या केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट दिली आणि मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं.
आत्महत्येच्या चिठ्ठीत काय सापडलं?
दरम्यान, प्रियकराने आत्महत्येआधी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ते दोघेही गेल्या १५ वर्षांपासून प्रमेसंबंधात होते. प्रेयसीने त्याला लग्नाचं वचन दिलं होतं. परंतु, तिने दुसऱ्याबरोबरच लग्न ठरवलं असल्याचं प्रियकराला नुकतंच कळलं होतं. यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिलंय की, मी मरणार आहे. यासाठी रेखा जबाबदार आहे. ती १५ वर्षे माझ्यासोबत राहिली आणि मला लग्न करण्याचं वचन दिलं. पण आता ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करणार आहे. म्हणूनच मी आत्महत्या करत आहे. कारण रेखाने माझा विश्वासघात केला आहे. यामुळे मी माझं जीवन संपवत आहे.”
कालपासून जोडपं होतं बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय प्रियकर दिल्लीतील त्रिलोकपुरी येथील रहिवासी होता तर २६ वर्षीय प्रेयसी नोएडातील सेक्टर ५८ येथील रहिवासी आहे. त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे जोडपे शुक्रवारपासून घरातून बेपत्ता होते आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता व्यक्तींची तक्रार दाखल केली होती.
