Noida Protest Pakistan Connection: राजधानी दिल्लीजवळील नोएडामध्ये पगारवाढीसाठी विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही कर्मचाऱ्यांनी दगडफेक व पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. काही वाहनं पेटवून देण्यात आली. मात्र, आता हे आंदोलन म्हणजे कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठीची निदर्शनं नसून उत्तर प्रदेश सरकारची लोकप्रियता सहन न झाल्यामुळे वातावरण बिघडवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा संशय उत्तर प्रदेश सरकारला आहे. एवढंच नाही, तर यात थेट पाकिस्तानचा हात असल्याचाही संशय व्यक्त केला जात असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी दिली आहे.

नोएडामध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन नेमकं कशासाठी?

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पगारवाढीची मागणी करूनदेखील कंपनी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची मागणी फेटाळली जात होती. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी मोठ्या संख्येनं सोमवारी रस्त्यावर उतरले. नोएडातील गौतम नगर परिसरात या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांपैकी काहींनी अचानक दगडफेक करायला सुरुवात केली. त्यापाठोपाठ पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. एक कार रस्त्यावर पेटवून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नोएडा पोलिसांना अतिरिक्त कुमक या परिसरात तैनात करावी लागली.

अफवांवर विश्वास ठेवू नका – पोलिसांचं आवाहन

दरम्यान, सोमवारी नोएडा भागात तणाव निर्माण झालेला असताना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडून कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, असं आवाहनदेखील पोलिसांनी केलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक सखोल तपास केला जात आहे.

नोएडात आंदोलन, पाकिस्तानचा हात?

एकीकडे कर्मचाऱ्यांचं आंदोलन पगारवाढीच्या मागणीसाठी असल्याचं सांगितलं जात असताना उत्तर प्रदेश सरकारला मात्र यात वेगळाच संशय येत आहे. उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी सोमवारी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना या घडामोडींमध्ये पाकिस्तानचा हात आहे का? यासंदर्भात तपास केला जात असल्याचं नमूद केलं.

काय म्हणाले अनिल राजभर?

“उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था आणि विकासाची प्रक्रिया अस्थिर करण्यासाठी हा सगळा प्रकार घडवून आणण्यात आल्याचं दिसत आहे. नुकतीच मीरत व नोएडामधून पाकिस्तानस्थित हस्तकांशी संबंध असणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये राज्याला अस्थिर करणाऱ्या कारस्थानांना बळ मिळण्याची शक्यता निर्माण होते. यासंदर्भात तपास यंत्रणा सखोल तपास करत आहेत”, अशी प्रतिक्रिया अनिल राजभर यांनी दिली. त्याचवेळी, तपास यंत्रणा या प्रकरणी काही मोठं कारस्थान होतं का? किंवा पाकिस्तानशी काही कनेक्शन होतं का? यासंदर्भातही तपास करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रम उधळून लावायचा होता?

दरम्यान, एकीकडे पाकिस्तान कनेक्शनचा संशय व्यक्त करतानाच मंत्री अनिल राजभर यांनी हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रस्तावित कार्यक्रम उधळून लावण्याचा कट तर नाही? अशीही शंका उपस्थित केली. सोमवारी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होती. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्यासाठी हे घडवून आणल्याची शंका मंत्री राजभर यांनी उपस्थित केली आहे.

“उत्तर प्रदेशमधल्या डबल इंजिन सरकारच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नाराज झालेल्या घटकांकडूनच अस्थिरता निर्माण करण्यासाठी अशी कट-कारस्थानं केली जात आहेत”, असा दावाही अनिल राजभर यांनी यावेळी केला.

कर्मचाऱ्यांना केलं शांततेचं आवाहन

अनिल राजभर यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनादेखील शांतात राखण्याचं आवाहन केलं आहे. “कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये आणि शांतता राखावी. कोणत्याही समस्येवर गोंधळ किंवा आक्रमक आंदोलन हा तोडगा असू शकत नाही. सरकार कर्मचाऱ्यांच्या सर्व अडचणी ऐकून घेण्यास तयार आहे”, असं राजभर म्हणाले.