नोएडाच्या सेक्टर ९४ येथील सुपरनोव्हा सोसायटीमध्ये शनिवारी एका ३५ वर्षीय तरुणाने ४३ व्या मजल्यावरून उडी घेतल्याची घटना घडली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख संभव जैन अशी झाली असून तो मानेसरचा रहिवासी होता. पोलिसांच्या माहितीनुसार, संभव शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजता ऑनलाइन बुकिंग करून सुपरनोव्हाच्या स्पायरा इमारतीतील एका खोलीत राहण्यासाठी आला होता. त्याने ‘एअरबीएनबी’वर एका दिवसासाठी खोली बुक केली होती आणि तो एकटाच तेथे थांबला होता. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

एसी दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला वाचवण्याचा प्रयत्न

घटनेपूर्वी जवळच्या एका फ्लॅटमध्ये एसी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संभव बाल्कनीच्या रेलिंगबाहेर लटकलेला दिसला. त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न करूनही संभवने ४३ व्या मजल्यावरून उडी घेतली. घटनेपूर्वीचे काही क्षण व्हिडीओमध्येही कैद झाले आहेत. संभव उंच इमारतीच्या बाल्कनीच्या बाहेरील भागात उभा असल्याचे दिसत आहे. खाली जमलेल्या लोकांमध्येही घबराट निर्माण झाली होती. काही जण सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती देताना आणि त्याला थांबवण्याबाबत चर्चा करताना ऐकू येतात.

घटनास्थळीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभवने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. उंचावरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला आणि त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पोलिसांच्या पथकाबरोबर गुन्हे अन्वेषण आणि पुरावे तपासणी पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून गुन्ह्याशी संबंधित आवश्यक ते सर्व पुरावे गोळा केले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

घटनेचा नेमका क्रम समजून घेण्यासाठी पोलिस सुपरनोव्हा इमारतीमधील तसेच आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याशिवाय घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांना या दुर्दैवी घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

कर्जामुळे आर्थिक तणावात असल्याची माहिती

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, संभववर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा होता आणि याच आर्थिक अडचणींमुळे तो तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ही दुर्घटना घडण्यापूर्वी तो मागील चार दिवसांपासून घरापासून दूर, वेगळ्या ठिकाणी राहत होता, अशी माहितीही समोर आली आहे. या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी पोलिसांनी त्याच्या वडिलांसोबत झालेल्या चॅटचीही तपासणी सुरू केली आहे.

मात्र संभवने आत्महत्या का केली, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.