Noida Balcony Accident Father Son Death: नोएडामध्ये हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. महागुन मायवूड्स सोसायटीच्या २३ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून पडल्यामुळे बाप-लेकाचा मृत्यू झाला. ४० वर्षीय रणदीप पात्रा आणि आरव (वय ११) हे बाल्कनीतून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. हाती आलेल्या माहितीनुसार, वडील आपल्या मुलाकडून बाल्कनीतून फूल तोडत होते. त्यावेळी मुलगा शिडीवरून खाली पडला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना वडीलही खाली पडले. या घटनेमुळे सोसायटीमध्ये शोककळा पसरली.

नेमके काय घडले?

शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी पहाटे घडली. बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गौर सिटी २ मधील महागुन मायवूड्स सोसायटीमध्ये पात्रा कुटुंब राहत होते. पहाटे बिसरख पोलीस ठाण्याला बाप-लेक इमारतीखाली पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. इमारतीखाली पडलेल्या बाप-लेकाला तात्काळ रुग्णालयात हलवले गेले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

मंदिरात जाण्यासाठी फूल तोडताना पडले

रणदीप पात्रा यांच्या पत्नीने सांगितले की, त्यांना आज सकाळी खाटू श्याम येथील एका फ्लॅटची नोंदणी करण्यासाठी जायचे होते. यासाठी तेथील एका मंदिरात त्यांना पूजा करायची होती. या पूजेसाठी त्यांनी बाल्कनीतील फुले तोडण्याचा विचार केला. बाल्कनीत मुलाला शिडीवर चढवून फुले काढत असताना मुलगा घसरून पडला. त्याला वाचवताना रणदीपही खाली कोसळले.

या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांना धक्का बसला. तसेच पात्रा कुटुंब आणि शेजारचे लोक धक्क्यात आहेत. आज सकाळी ज्यांना मंदिरात जायचे होते, त्या घरात आता दुःखाचे वातावरण आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच २३ ऑक्टोबर रोजी याच सोसायटीच्या २३ व्या मजल्यावरून एका १३ वर्षीय मुलीने कथितपणे उडी मारून आत्महत्या केली होती.