Noida Techie Drowns in Ditch : नोएडामध्ये दाट धुक्यामुळे झालेल्या एका भीषण अपघातात २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांची कार ड्रेनेज स्ट्रक्चरच्या कठड्याला धडकली आणि खोल खड्ड्यात कोसळल्याने हा अपघात झाला. युवराज मेहता असे या मृत तरुणाचे नाव असून, शुक्रवारी रात्री सेक्टर १५० जवळ कामावरून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.

दाट धुके आणि रिफ्लेक्टर्स नसल्यामुळे युवराज मेहातचीची कार दोन ड्रेनेज बेसिन्सना वेगळे करणाऱ्या एका उंच भिंतीला धडकली आणि ७० फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली. रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने युवराजच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत कार पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. मृत्यू समोर दिसत असताना युवराजने त्याचे वडील राजकुमार मेहता यांना देखील फोन केला होता. “बाबा, मी एका पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात पडलोय. मी बुडतोय, प्लीज या आणि मला वाचवा. मला मरायचं नाहीये,” असे त्याने वडिलांना सांगितले, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

बचाव पथक पोहचलं पण…

काही मिनिटांतच स्थानिक पोलीस आणि डायव्हर्स, एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव मोहिम देखील सुरू केली. युवराजचे वडील देखील घटनास्थळी हजर होते. जवळपास ५ तास अथक मेहनत केल्यानंतर कार आणि युवराज यांना बाहेर काढण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता, आणि युवराजला मृत घोषित करण्यात आले.

या दुर्घटनेनंतर कुटुंबाने एक तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व्हिस रोडच्या बाजूला रिफ्लेक्टर्स बसवणे किंवा गटारावर झाकण टाकणे ही कामे करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. दाट धुक्यात रिफ्लेक्टर्स नसल्यामुळेच हा अपघात झाला असे युवराजच्या वडिलांनी म्हटले आहे. नॉलेज पार्क पोलीस स्टेशनचे प्रभारी सर्वेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला असल्यास त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतपाची लाट उसळली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन देखील केले. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सर्व्हिस रोडवरॉ रिफ्लेक्टर्स आणि साईन बोर्ड बसवण्यास त्यांच्याकडून वारंवार सांगितले गेले होते, पण काहीही केले गेले नाही असा स्थानिकांचा दावा आहे. या घटनेनंतर लगेचच प्रशासनाने हा खोल खड्डा कचरा आणि इतर राडारोडा टाकून बुजवून घेतला आहे.

१० दिवसांपूर्वी असाच एक अपघात घडला होता असे स्थानिकांनी सांगितले. त्या घटनेत एक ट्रक याच गटाराच्या भिंतीला धडकला होता, मात्र सुदैवाने चालक थोडक्यात बचावला.

युवराज हा त्याच्या वडिलांबरोबर सेक्टर १५० मध्ये टाटा युरेका पार्क येथे राहात होता. त्याच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि तो घरातील एकमेव कमवता व्यक्ती होता. त्याच्या थोरल्या बहि‍णीचे लग्न झाले असून ती ब्रिटनमध्ये राहते.