Noida Woman Viral Video: महिलांशी असभ्य वर्तन केल्याच्या अनेक घटना चर्चेत येतात. काही प्रकरणात कारवाई होते तर काही प्रकरणात परस्पर चर्चा करून प्रकरण आपापसांतच 'मिटवलं' जातं. नोएडामध्ये नुकत्याच घडलेल्या अशाच एका प्रकरणात एका तरुणीनं एका जोडप्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या तरुणानं दारूच्या नशेत आपला रेट विचारल्याचा दावा या तरुणीनं एका व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या तरुणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात आपापसांत चर्चा करून आम्ही प्रकरण संपवल्याचं या तरुणीनं सांगितलं आहे. नेमकं घडलं काय? हा सगळा प्रकार रविवारी नोएडा सायबर सिटीमधील गार्डनर गॅलेरिया मॉलजव घडल्याचं समोर आलं आहे. रविवारी रात्री या मॉलजवळ काही व्यक्तींमध्ये बाचाबाची आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी त्यांना पोलीस स्थानकात नेऊन त्यांची चौकशी केली. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं नोएडा पोलिसांकडून नंतर सांगण्यात आलं. तसेच, दोन्ही बाजूंनी सामोपचारानं प्रकरण मिटवल्याचंही समोर आलं. मात्र, ही घटना घडल्यानंतर काही वेळात तरुणीनं केलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा दावा केला होता. "आम्ही इथे पोलीस स्थानकाजवळ उभे आहोत. एका तरुणानं मला माझा रेट विचारला. माझे पती आणि दीरासोबत मी उभी होते. पोलीस आम्हाला इथे घेऊन आले आहेत. इथे त्या तरुणासोबत असणारी मुलगी मला धमकवायला लागली की माझे वडील डीएसपी आहेत वगैरे. मी म्हटलं तुझ्याबरोबर जो मुलगा होता, त्यानं मला माझा रेट विचारला. मग कोणत्या पतीला, दीराला राग येणार नाही? त्यांनी त्यांचा राग त्या तरुणावर काढला.त्यानंतर ती मुलगी उलट आम्हालाच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी द्यायला लागली", असं व्हिडीओतील तरुणी सांगत असल्याचं दिसत आहे. "इथे कुमार साहेब म्हणून पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी आम्हाला बाहेर काढलं आणि तिथे आत त्यांना बसवून ते बोलत आहेत. आम्ही बाहेर आहोत. आमची तक्रार कुणी घेत नाहीये. हाच योगींचा न्याय आहे का? नोएडा सायबर सिटीमध्ये हे सगळं घडतंय", असा दावा या तरुणीनं केला. लग्न कधी करतोस? असं सारखं विचारल्यामुळे वैतागलेल्या तरूणाने केली शेजाऱ्याची हत्या तरुणीचा दुसरा Video, प्रकरण मिटल्याचा दावा दरम्यान, दुसऱ्या दिवशी तरुणीचा दुसरा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात तरुणीनं सामोपचारानं प्रकरण मिटल्याचा दावा केला आहे. "काल मी, माझे पती आणि माझे दीर फिरायला गेलो होतो. तिथे एका गटाशी आमचा वाद झाला. बाचाबाची झाली. त्यानंतर पोलीस आम्हाला पोलीस चौकीला घेऊन गेले. तिथे आपापसांत चर्चा करून आम्ही वाद मिटवला आहे. काल मी जो व्हिडीओ टाकला तो कुणाच्यातरी दबावामुळे टाकला असेल. पण आता आम्ही पोलिसांच्या कार्यवाहीवर समाधानी आहोत", असं या व्हिडीओमध्ये तरुणीनं म्हटलं आहे. दरम्यान, व्हिडीओ करणाऱ्या मुलीच्या पतीने आधी दुसऱ्या गटातील महिलेचा हात पबमध्ये नाचताना पकडल्याचा दावाही आता केला जात असून त्याच रागातून त्यांच्यात वाद झाल्याचंही सांगितलं जात आहे.