लखनऊमधील डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठातील मेसमध्ये मांसाहारी पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या विद्यापीठातील मेसमध्ये केवळ शाकाहारी पदार्थच विद्यार्थ्यांना देण्यात येत असून, कोणी मांसाहारी पदार्थाची मागणी केल्यासही त्याला ते पदार्थ देण्यात येत नाहीत. यामुळे विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
दलित विचारवंत कांचा इलैया यांनी गेल्या महिन्यात गोमांस खाणे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून लखनऊमधील विद्यापीठामध्ये तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने मेसमधील मांसाहारी पदार्थ बंदच करण्याचा निर्णय घेतला. कांचा इलैया यांच्या भाषणाची सीडी विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. सोबती यांनी बघितल्यानंतर त्यांनीही लगेचच मेसमधील मांसाहारी पदार्थच बंद करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.  दरम्यान, मांसाहारी पदार्थ बंद करण्याचा निर्णय दलितविरोधी असल्याचे सांगत विद्यापीठातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी मंगळवारी मोर्चाही काढला. मांसाहारी पदार्थ मेसमध्ये तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.