Sarke Chunar Song Ban: Ashwini Vaishnav addresses Nora Fatehi song controversy and freedom of speech in Lok Sabha : अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेले बॉलिवूड चित्रपटातील एक गाणे सध्या सांगलेच वादात सापडले आहे. या गाण्यावर सोशल मीडियातून चांगलीच टीका होत असून यावर बंदी घालण्याची मागणी देखील केली जात आहे. दरम्यान या गाण्याचा वाद थेट संसदेपर्यंत पोहचला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी या वादग्रस्त बॉलिवूड गाणे ‘सरके चुनर’ वर बंदी घालण्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे समाज आणि संस्कृतीचा आदर करणाऱ्या उचित निर्बंधांच्या मर्यादेतच असले पाहिजे असे वैष्णव यांनी यावेळी नमूद केले.

या वादग्रस्त गाण्याबाबत लोकसभेत बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, “गाण्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छित आहे की, आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भारताच्या संविधान निर्मात्यांनी जे रास्त निर्बंध (reasonable restrictions) लावले आहेत, त्यानुसारच चालले पाहिजे, अभिव्यक्ती स्वतंत्र्य हे अमर्याद असू शकत नाही, ते समाज आणि संस्कृतीच्या संदर्भातच असायला हवे.”

पुढे बोलताना वैष्णव म्हणाले की, “डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यामातून ज्या पद्धतीने गोष्टी आज वेगाने पसरतात, त्यामध्ये समाजाच्या सुरक्षेसाठी विशेषत: मुले, महिला आणि समाजातील वंचित घटकांच्या सुरक्षिततेसाठी जी काही कठोर पावले उचलली पाहिजेत, ती उचलण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे.”

हा मुद्दा समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्यानी या वादग्रस्त गाण्याबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते.

नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे आगामी ‘केडी: द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटातील आहे. हे गाणे ऑनलाइन प्रदर्शित झाल्याबरोबर या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी गाण्यातील काही शब्द आणि दृश्यांवर आक्षेप नोंदवला होता.

या गाण्याचे हिंदी व्हर्जन काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते, पण याला सर्व स्तरातून होत असलेला विरोध पाहून हे दगाणे नंतर काढून टाकण्यात आले. मात्र कन्नड, मल्याळम, तेलगू आणि तमिळ भाषेतील हे गाणे अजूनही यूट्यूबवर उपलब्ध आहे. दरम्यान हा चित्रपट ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, तो अनेक भाषांमध्ये डब केला जाणार आहे.

गीतकाराची प्रतिक्रिया

या गाण्याचे गीतकार म्हणून रकीब आलमचं नाव दाखवलं जातंय. पण हे गाणं आपण लिहिलं नसून फक्त भाषांतर केलंय, असं त्यांनी म्हटलं. निर्मात्यांना असं अश्लील गाणं न करण्यास सांगितलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. आता निर्मात्यांनी युट्यूबवरून हे गाणं हटवलं आहे. आपण गाण्याचे नवीन बोल लिहून दिले असून हे गाणं पुन्हा रिलीज केलं जाईल, त्याचबरोबर निर्माते माफीही मागणार आहेत, असं रकीब आलम यांनी सांगितलं.