उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल २५८ जणांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली आहे. ही घटना रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी घडली आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १७२ जणांना वाचवण्यास यश आलं आहे.
उत्तर सायप्रसमधील किरेनिया बंदरातून तुर्कीकडे निघालेल्या एका प्रवासी बोटीला समुद्रात प्रवास सुरू केल्यानंतर काही वेळातच अपघात झाला. किरेनियाच्या किनाऱ्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर ही बोट अचानक उलटली. या घटनेचा काळजाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
ही घटना घडली तेव्हा या प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. व्हिडीओमध्ये अनेकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे. दरम्यान, किरेनियाचे महापौर मुरात सेनकुल यांनी सीएनएन तुर्क या वाहिनीशी बोलताना सांगितलं की, २५८ जणांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली आहे. मात्र, ही घटना घडल्यानंतर लगेच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत काही जणांना वाचवलं असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे.
या बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाची जहाजे, हेलिकॉप्टर्स आणि खासगी बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. या बरोबरच किरेनिया बंदरावर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. वृत्तानुसार, बचावकार्यात मदत करण्यासाठी आणखी एक जहाज अपघातस्थळी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे जहाज खवळलेल्या पाण्यात एका बाजूला कलंडलेल्या अवस्थेत दिसत आहे. तसेच लाइफ जॅकेट्स घातलेल्या काही लोकांना बाहेर काढताना व्हिडीओत दिसत आहे. तर काही लोक अद्यापही पाण्यातच दिसत आहेत. तसेच या बचावकार्यासाठी घटनास्थळी तुर्की-सायप्रियन तटरक्षक दलाच्या अनेक बोटी आणि बचाव कार्य करणारी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आलेले आहेत.
