scorecardresearch

हनुमान जयंतीला हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरीत मोठी कारवाई; अनधिकृत दुकानं, घरांवर बुलडोझर; ४०० पोलीस तैनात

पालिकेकडून सात बुल्डोझरच्या सहाय्याने कारवाई; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली होती, तसंच अनेक वाहने पेटवून देण्यात आली होती. या हिंसाचारत आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत असून आतापर्यंत २५ जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. दरम्यान पालिकेने दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई सुरु केली आहे.

दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ; आठ पोलीस जखमी; १४ जणांना अटक

दिल्लीच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दंगलीतील आरोपींनी जहांगीरपुरीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामं उभी केल्याचा दावा करत यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली असून बुल्डोझरच्या सहाय्याने अनधिकृत दुकानं, घरं तोडली जात आहेत. दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ४०० पोलीस तैनात करण्याची मागणी पालिकेने केली आहे.

सकाळी दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दिपेंद्र पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईआधी तेथील स्थितीचा आढावा घेतला. पोलिसांना लिहिलेल्या पत्रात, महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य आणि स्वच्छता विभाग आणि इतरांसोबत संयुक्तपणे जहांगीरपुरीमधील अतीक्रमणावर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं.

दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनीदेखील उत्तर पालिकेच्या आयुक्तांनी पत्र लिहीत जहांगीरपुरी येथील दंगलखोरांनी उभ्या केलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती घेत त्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र लिहिलं होतं.

नेमकं काय झालं होतं?

शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर हिंसाचार उफाळला. ‘ही पारंपरिक मिरवणूक होती आणि पोलीस पथक तिच्यासोबत होते. मात्र ती कुशल चित्रपटगृहाजवळ पोहोचल्यानंतर दोन समुदायांत संघर्ष झाला. हा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले’, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं. दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना आणि विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवसथा) दिपेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली असून संवेदशनीलपणे प्रकरण हाताळताना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: North delhi municipal corporation conducts anti encroachment drive in jahangirpuri in delhi sgy

ताज्या बातम्या