Tamil Nadu DMK Minister Durai Murugan on Delimitation : मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून केंद्र व तमिळनाडू सरकारमध्ये संघर्ष चालू आहे. अशातच आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून अशी काही वक्तव्ये येत आहेत ज्यामुळे उत्तर भारत व दक्षिण भारतीय लोकांमध्ये मोठी दरी निर्माण होऊ शकते. तमिळनाडू सरकारमधील (द्रमुक) वरिष्ठ मंत्री दुराई मुरुगन यांनी अलीकडेच केलेलं एक वक्तव्य यापैकी एक उदाहरण आहे. ते म्हणाले, “उत्तर भारतीय संस्कृतीत महिलांना ५-१० पुरुषांशी विवाह करण्याची परवानगी आहे. मात्र, आपल्याकडे (द्रविड) अशी संस्कृती नाही.
दुराई मुरुगन यांनी वेल्लोरे येथील एका सभेला संबोधित करताना म्हटलं की “द्रविड संस्कृती (दक्षिण भारतातील संस्कृती, प्रामुख्याने तमिळ) उत्तर भारताच्या संस्कृतीपेक्षा उत्तम आहे. उत्तर भारताची संस्कृती ही आपल्या संस्कृतीच्या विपरित आहे. उत्तर भारतीय संस्कृती बहुविवाहांसारख्या गोष्टींचं समर्थन करते. उत्तर भारतातील संस्कृती तिथल्या स्त्रियाांना पाच-पाच, १०-१० पुरुषांशी विवाह करण्याची परवानगी देते. मात्र तमिळ संस्कृतीत अशा गोष्टी नाहीत.” आपल्या या दाव्यासह त्यांनी महाभारतातील द्रौपदीचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “द्रौपदीने देखील पाच पुरुषांशी विवाह केले होते.”
उत्तर भारतातील महिला पाच किंवा १० पुरुषांशी विवाह करू शकतात : मुरुगन
मुरुगन म्हणाले, “आपल्या संस्कृतीत एक पुरुष एका महिलेशी विवाह करू शकतो. परंतु, उत्तर भारतातील महिला पाच किंवा १० पुरुषांशी विवाह करू शकतात. तिथले पाच पुरुष एका महिलेशी विवाह करतात. ही त्यांची संस्कृती आहे. एक गेल्यावर दुसरा येतो.
उत्तर भारतातील लोकांनी १७, १८ मुलं जन्माला घातली : मुरुगन
दुराई मुरुगन एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, “केंद्रात सत्ता असलेल्या लोकांनी आम्हाला लोकसंख्या नियंत्रित करण्यास सांगितलं. आम्ही त्यांच्या सूचनेनुसार लोकसंख्या नियंत्रित केली. आता आमची लोकसंख्या कमी झाली आहे. मात्र, त्याच काळात उत्तर भारतातील लोकांनी १७, १८, १९ मुलं जन्माला घातली. कारण त्यांच्याकडे दुसरी काही कामं नाहीत.”
“तमिळनाडू सरकार मतदारसंघ पुनर्रचनेच्या विरोधात”
मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर बोलताना दुरई मुरुगन यांनी ही वक्तव्ये केली. ते म्हणाले, “तमिळनाडू सरकार मतदारसंघ पुनर्रचनेच्या विरोधात आहे. मतदारसंघ पुनर्ररचना केल्यास दक्षिण भारतातील सर्व राज्यांचं संसदेतील प्रतिनिधित्व कमी होईल. दुसऱ्या बाजूला उत्तर भारतातील राज्याचं संसदेतील प्रतिनिधित्व अनेक पटींनी वाढेल. त्यांचं प्रतिनिधित्व आधीपासूनच जास्त आहे.”