TN Minister Panipuri remark North Indians: त्रिभाषा धोरणावरुन महाराष्ट्रात जोरदार वाद झाल्यानंतर, दक्षिणेत देखील या धोरणाविरोधात भूमिका मांडली जात आहे. तमिळनाडूचे कृषी मंत्री एमआरके पनीरसेल्वम यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कृषी मंत्री पनीरसेल्वम यांनी उत्तर भारतीयांची तुलना हलक्या कामांसोबत करत नवा वाद ओढून घेतला आहे. पनीरसेल्वम यांच्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हिंदी विरुद्ध प्रादेशिक भाषा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
फक्त हिंदी येत असल्याची टीका
मंत्री पनीरसेल्वम एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. उत्तरेकडील लोकांनी ‘फक्त हिंदी शिकले आहे’, त्यांच्यासाठी तमिळनाडूमध्ये नोकरीच्या संधी मर्यादित आहेत. अनेकदा त्यांना कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागतात. दुसरीकडे तमिळनाडूमधील विद्यार्थ्यांना तमिळ आणि इंग्रजी शिकल्यामुळे फायदा होतो, असा दावा पनीरसेल्वम यांनी केला आहे.
काय म्हणाले मंत्री पनीरसेल्वम?
“उत्तर भारतीय तमिळनाडूमध्ये फक्त टेबले साफ करण्यासाठी येत आहेत, ते बांधकाम मजूर, पाणीपुरी विक्रेते म्हणून काम करण्यासाठी येतात. याचं कारण ते फक्त हिंदी शिकले आहेत. याउलट आमची मुलं परदेशात गेली आहेत, कारण आम्ही द्विभाषिक धोरण स्वीकारले आहे. तमिळसह येथील मुलं इंग्रजीही चांगले शिकले. आता अमेरिका, लंडनमध्ये जाऊन कोट्यवधी रुपये कमवत आहेत,” असे पनीरसेल्वम म्हणाले.
टीकेनंतर बाजू सावरण्याचा प्रयत्न
मंत्री पनीरसेल्वम यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. कृषीमंत्र्यांचे विधान असंवेदनशील आणि फूट पाडणारे असल्याची टीका त्याच्यावर करण्यात आली आहे. दरम्यान, ‘पक्षाचा हिंदी भाषिक किंवा उत्तर भारतीय करत असलेल्या नोकऱ्यांना कोणताही विरोध नाही’, असे म्हणत सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाचे प्रवक्ते डॉ. सय्यद हफीजुल्ला यांनी पनीरसेल्वम यांची बाजु सावरण्याचा प्रयत्न केला.
“द्विभाषिक धोरणामुळे तामिळनाडू आणि येथील लोकांना फायदा झाला. इंग्रजीला प्राधान्य नसल्यामुळे, हिंदी भाषिक राज्यांतील लोक शिक्षणात प्रगती करू शकलेले नाहीत,” असे डॉ. सय्यद हफीजुल्ला म्हणाले.
विविध पक्षातून टीका
पनीरसेल्वम यांच्या वक्तव्यावर इतर पक्षातील नेत्यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तमिळनाडूची अर्थव्यवस्था इतर राज्यांतील स्थलांतरित मजुरांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे’, असे काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले.
समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी या विधानाला उत्तर भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले. तर, ‘उत्तर भारतीयांनी देशात जिथं काम केलं तिथं आर्थिक विकासात मोठे योगदान दिलं आहे’, असे जेडी(यू)चे खासदार संजय झा म्हणाले.

