अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्येही मागील चार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे जगभरात तणावाचं वातावरण आहे. असं असतानाच आता उत्तर कोरियाने रविवारी आपल्या पूर्व किनाऱ्यावरून तीन तासांत दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.

उत्तर कोरियाने रविवारी समुद्राच्या दिशेने कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे. अमेरिकेच्या ‘शत्रुत्वापूर्ण कारवायांना’ प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आपली अण्वस्त्र क्षमता बळकट करण्याची धमकी उत्तर कोरियाने दिल्याच्या दोन दिवसांनंतर ही क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसस्थेने दिलं आहे.

उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचण्यांची दखल घेतली जावी, अशी विनंती दक्षिण कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की, पहिलं प्रक्षेपण स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वॉनसान परिसरातून झालं. हे क्षेपणास्त्र शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक मिसाईल असल्याचं ओळखलं गेलं आणि ते पूर्व समुद्राच्या दिशेने डागण्यात आलं.

त्यानंतर तीन तासांनी उत्तर कोरियाने आणखी एक अज्ञात क्षेपणास्त्र डागलं. याचा सविस्तर तपशील उपलब्ध झाला नाही. मात्र, दुसरं प्रक्षेपण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचं निश्चित झालं, तर याचा अर्थ उत्तर कोरियाने तीन तासांच्या कालावधीत दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत असं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, दक्षिण कोरियाने अंदाज वर्तवला की, पहिल्या क्षेपणास्त्राने सुमारे ४५० किमी अंतर कापलं असावं. जपानच्या संरक्षण मंत्रालयानेही असा अंदाज वर्तवला की, हे पहिलं क्षेपणास्त्र बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचं दिसत होतं.

दक्षिण कोरियाने म्हटलं की, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा प्रक्षेपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवून होत्या. तसेच या घडामोडींची माहिती एकमेकांना दिली जात आहे. तसेच उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राबाबतची माहिती जपानलाही देण्यात आल्याचं दक्षिण कोरियाने स्पष्ट केलं आहे.

दक्षिण कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध केला आहे. ही चाचणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांचं उल्लंघन करणारी असल्याचं म्हटलं आहे. तसेच उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्रविषयक हालचाली थांबवाव्यात, असं आवाहनही दक्षिण कोरियाने केलं आहे.