गेल्या ६ महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध अद्याही थांबलेलं नाहीये. या युद्धाचा जगाला फटका बसत आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्येही मागच्या चार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या दोन्ही युद्धामुळे संपूर्ण जगभरात तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत आता उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर कोरियाने २० सप्टेंबर रोजी पूर्व किनाऱ्यावरून ३ तासांत दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यामुळे जगात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाने शनिवारी (३ ऑक्टोबर) पूर्व समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्र चाचणी घेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आहेत. याबाबत हुकूमशाह किम जोंग उन यांच्या बहीण किम यो जोंग यांनी एका निवेदनात ही माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

वृत्तानुसार, दक्षिण कोरियाच्या लष्कराने दावा केला की, उत्तर कोरियाने एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. जे त्यांच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्राच्या दिशेने ७०० किमी पेक्षा जास्त अंतर पार करून गेले. दरम्यान, सीमाभागातील सुरुंग स्फोटांमुळे दक्षिण कोरियाचे तीन सैनिक जखमी झाल्याने दोन्ही प्रतिस्पर्धी देशांमधील तणाव वाढला आहे. असं असतानाच उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून हुकूमशाह किम जोंग उन यांच्या हालचालींकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, उत्तर कोरियाने गेल्या काही आठवड्यांत अनेक लष्करी प्रदर्शने केली आहेत. त्यामध्ये कथित हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी, प्रत्यक्ष गोळीबाराचा सराव आणि नवीन युद्धनौकेचे लोकार्पण यांचा समावेश आहे. तसेच गेल्या महिन्यात उत्तर कोरियाने अणुचाचण्या थांबवण्याचे आवाहन करणारे आंतरराष्ट्रीय निवेदन फेटाळून लावलं आणि त्याला ‘शत्रूकडून आमच्या राज्याविरुद्ध केलेले गंभीर राजकीय चिथावणीखोर कृत्य’ असं म्हटलं होतं.

३ तासांत २ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली

उत्तर कोरियाने २० सप्टेंबर रोजी पूर्व किनाऱ्यावरून ३ तासांत दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यामुळे जगात खळबळ उडाली होती. त्यानंतर उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचण्यांची दखल घेतली जावी, अशी विनंती दक्षिण कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे केली होती. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं होतं की, पहिलं प्रक्षेपण स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वॉनसान परिसरातून झालं होतं. हे क्षेपणास्त्र शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक मिसाईल असल्याचं ओळखलं गेलं आणि ते पूर्व समुद्राच्या दिशेने डागण्यात आलं. त्यानंतर तीन तासांनी उत्तर कोरियाने आणखी एक अज्ञात क्षेपणास्त्र डागलं. याचा अर्थ उत्तर कोरियाने तीन तासांच्या कालावधीत दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या असा दावा दक्षिण कोरियाने केला होता.