scorecardresearch

जगावर आणखी एका युद्धाचं संकट? हुकूमशाह किम जोंग उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाली “आण्विक हल्ला…”

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या बहिणीने दक्षिण कोरियाला आण्विक हल्ला करत संपवून टाकण्याची धमकी दिली आहे

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या बहिणीने दक्षिण कोरियाला आण्विक हल्ला करत संपवून टाकण्याची धमकी दिली आहे (File Photo: Reuters)

एकीकडे रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं असल्याने जगभरात चिंतेचं वातावरण असताना आता आणखी एका युद्धाचं संकट निर्माण होण्याची भीती आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या बहिणीने दक्षिण कोरियाला आण्विक हल्ला करत संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. किम यो जोंगने म्हटलं आहे की, “आम्ही युद्धाविरोधात आहोत, पण जर दक्षिण कोरियाला लढायचं असेल तर आम्ही आण्विक हल्ला करु शकतो”.

“दक्षिण कोरियाने एका चर्चेदरम्यान सैन्याच्या क्षमतेचा उल्लेख केला होता. दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आमच्यातील संबंध अजून बिघडले असून यामुळे सैन्यातील तणाव अजून वाढला आहे,” असं किम यो जोंगने म्हटलं आहे.

“आमच्या मिसाईल्स अचूक हल्ला करु शकतात”

काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री सुह वूक यांनी म्हटलं होतं की, “त्यांच्या देशाकडे अनेक मिसाईल्स आहेत ज्या उत्तर कोरियामधील कोणत्याही ठिकाणावर अचूक हल्ला करु शकतात”. यावेळी त्यांनी उत्तर कोरिया आपला शत्रू असल्याचाही उल्लेख केला होता. दरम्यान दक्षिण कोरियाने केलेल्या या वक्तव्यामुळे उत्तर कोरियाने नाराजी जाहीर केली असून याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला आहे.

आण्विक हल्ला कऱण्यापासून मागे हटणार नाही – उत्तर कोरिया

उत्तर कोरियाने याआधीही अनेकदा इशारा दिला आहे की, जर दक्षिण कोरिया किंवा अमेरिकेने आव्हान दिलं तर आण्विक शस्त्रांचा वापर करण्यापासून आपण मागे हटणार नाही. उत्तर कोरिया गेल्या काही दिवसांपासून देशात आण्विक चाचण्या करत असताना दक्षिण कोरियाने असं वक्तव्य करत आपणही बलाढ्य असल्याचं दाखवलं आहे असं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: North koreas nukes could eliminate south says kim jong un sister kim yo jong sgy