पीटीआय, भुवनेश्वर

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर ओडिशात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वाधिक फटका भद्रक आणि जाजपूर या जिल्ह्यांना बसला असून एकूण पाच लाख लोक बाधित झाले आहेत. त्यातील दोन लाख ३७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून ३०० मदत केंद्रात त्यांनी आसरा घेतला आहे. दरम्यान, बालासोर जिल्ह्यातील कापसुदा गावामध्ये सोमवारी मुसळधार पावसामुळे शेजारच्या इमारतीची भिंत एका घरावर कोसळल्याने घरातील दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये ६५ वर्षीय महिला आणि तिच्या अठरा वर्षीय नातवाचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत महिलेची नातही गंभीर जखमी झाली.

मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि मदतकार्याचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने राज्य शासनाच्या सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून या भागातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशात दोघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातही पावसाचा जोर वाढला आहे. शाहजहानपूर जिल्ह्यातील मुदिया कुरमियन गावामध्ये मुसळधार पावसामुळे एका घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. कच्च्या घराचे छत शेजारच्या घरावर कोसळल्याने ही दुर्घटना घडली.