Indians Deported in 2025: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सुत्रे हाती घेतली आणि अवैध स्थलांतरितांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. हाताला बेड्या ठोकलेले भारतीय नागरिक अमेरिकेच्या लष्करी विमानातून भारताच्या विमानतळावर उतरलेले आपण पाहिले. पण २०२५ या वर्षात अमेरिका नाही तर आखाती देशांतून सर्वाधिक भारतीय नागरिकांची हद्दपारी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘या’ आखाती देशाने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केलेली आहे. त्याशिवाय भारतीय नागरिकांचीही हद्दपारी केली.

परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची सविस्तर आकडेवारी राज्यसभेत सादर केली आहे. या आकडेवारीनुसार, वर्ष २०२५ मध्ये सौदी अरेबिया या देशातून ११,००० हून अधिक भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. जगभरातून ८१ देशांतून भारतीय नागरिक पुन्हा मायदेशी पाठविण्यात आले आहेत. त्या सर्वांत सौदी अरेबियातून परतलेल्यांची संख्या अधिक आहे.

अमेरिकेतून किती भारतीय हद्दपार

सौदी अरेबियाच्या खालोखाल अमेरिकेतून सर्वाधिक साधारण ३,८०० भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. यात बहुसंख्य खासगी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागच्या पाच वर्षांच्या आकडेवारीची तुलना केली तर २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार केल्याचे दिसते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरीतांवर केलेली कारवाई, कागदपत्रांची वाढलेली छाननी, व्हिसा स्थिती, कामाचे अधिकार आणि ओव्हरस्टे इत्यांदी कारणांमुळे अमेरिकेतून हद्दपारीचे प्रमाण वाढले आहे.

अमेरिकेतून सर्वाधिक हद्दपारी वॉशिंग्टन डीसी (३,४१४) आणि ह्युस्टन (२३४) येथून करण्यात आली आहे.

इतर कोणत्या देशातून भारतीय हद्दपार

सौदी आणि अमेरिके व्यतिरिक्त म्यानमार (१,५९१), युएई (१,४६९), बहरीन (७३४), मलेशिया (१,४८५), थायलंड (४८१) आणि कंबोडियामधून (३०५) जणांना परत भारतात पाठविण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आखाती देशांमधून झालेल्या हद्दपारीसाठीची कारणेही विशद केली आहेत. व्हिसाचा काळ संपल्यानंतरही तिथे थांबणे (ओव्हरस्टे), वैध वर्क परमिटशिवाय काम करणे, कामगार नियमांचे उल्लंघन करणे, मालकांकडून फरार होणे आणि दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणांमध्ये गुंतल्यामुळे काही जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

तेलंगणा सरकारच्या NRI सल्लागार समितीचे उपाध्यक्ष भीमा रेड्डी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला आखाती देशांतील हद्दपारीबद्दल माहिती देताना सांगितले की, बऱ्याच प्रकरणांमध्ये स्थलांतरित कामगार हे एजंट्सकडून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडलेले असतात. विदेशात गेल्यानंतर पोलिसांनी पकडताच त्यांना हद्दपार केले जाते.

दरम्यान म्यानमार आणि कंबोडियासारख्या देशांमधून होणारी हद्दपारी वेगळ्या कारणांमुळे झाली आहे. तिथून हद्दपार झालेले बहुतेक भारतीय हे सायबर गुलामगिरीच्या जाळ्यात अडकले होते. म्यानमार हे गेल्या काही काळात सायबर गुन्हेगारी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उद्यास आले आहे. भारतीय नागरिकांना उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना तिथे सायबर गुन्हेगारी करण्यास भाग पाडले जाते. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर बऱ्याच भारतीय नागरिकांची तिथून सुटका करण्यात आली आहे.