चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सियांग जिल्ह्यातून एका १७ वर्षीय तरुणाचे चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने अपहरण केल्याच्या घटनेची माहिती नसल्याचे म्हटले आहे. पण पीएलए सीमांवर नियंत्रण ठेवते आणि बेकायदेशीर प्रवेशांवर कारवाई करते असे चीनने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी बुधवारी, पीएलएने राज्यातील भारतीय हद्दीतील अप्पर सियांग जिल्ह्यातून एका १७ वर्षीय किशोरवयीन मुलाचे अपहरण केल्याची माहिती दिली होती. गाओ यांनी सांगितले की, अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मिराम तारोन असे आहे. चिनी सैन्याने सेउंगला प्रदेशातील लुंगटा जोर भागातून या मुलाचे अपहरण केले. पीएलएमधून पळून जाण्यात यशस्वी झालेला तारोनचा मित्र जॉनी यिंग याने स्थानिक अधिकाऱ्यांना अपहरणाची माहिती दिली.

पीएलएच्या अपहरणाच्या आरोपांबद्दल त्याच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने, मला परिस्थितीबद्दल माहिती नाही, असे म्हटले आहे. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी आणि परत आणण्यासाठी भारतीय लष्कराने पीएलएकडे मदत मागितल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे.

जेव्हा भारतीय लष्कराला तारोनबद्दल कळले, तेव्हा त्यांनी ताबडतोब हॉटलाइनद्वारे पीएलएशी संपर्क साधला आणि वनौषधी गोळा करणाऱ्या एका मुलाचा रस्ता चुकला आहे आणि त्याचा शोध लागलेला नाही, असे सांगितले होते.

अरुणाचल प्रदेशवर चीन सातत्याने आपला दावा सांगत आहे. अरुणाचलबाबत चीनचा हेतू लपलेला नाही. चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांची नावे बदलून महिनाही उलटलेला नाही. चीनने आपल्या नवीन जमीन सीमा कायद्यांतर्गत अरुणाचलच्या १५ ठिकाणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. चीनने हा कायदा २०२२ मध्येच लागू केला. चीनने आठ शहरे, चार पर्वत, दोन नद्या आणि एका खिंडीसह १५ ठिकाणांची नावे बदलली आहेत.

अरुणाचल प्रदेशच्या ९०,०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर चीनचा दावा आहे. चीन त्या भागाला दक्षिण तिबेट मानतो. चीनने २०१७ मध्ये पहिल्यांदा अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली होती. त्यावेळी चीनने अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांना नवीन नावे दिली होती. मात्र, दोन्ही प्रसंगी भारताने चीनच्या कृतीला जोरदार प्रत्युत्तर दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not aware of missing teenager china clarification after allegations on pla abn
First published on: 20-01-2022 at 22:41 IST