फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सगळे जग आपली कन्या मॅक्झिमा व इतर मुलांच्या भल्यासाठी झकरबर्ग व त्यांच्या पत्नीने कंपनीच्या त्यांच्याकडे असलेल्या समभागांपैकी ९९ टक्के भाग (शेअर) मानवतेच्या कार्यासाठी दान देण्याचे ठरविले आहे. या समभागांची किंमत ४५ अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे.
मॅक्सला लिहिलेल्या पत्रात झकरबर्ग यांनी म्हटले आहे, की मॅक्स तुझे आम्ही या जगात स्वागत करतो. सर्वानी सुखी व समाधानी असावे. तुझ्या सोनपावलांनी घरात आनंदाचे वातावरण आले आहे. फेसबुक पेजवर हे पत्र टाकण्यात आले आहे. झकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी मॅक्सला गेल्या आठवडय़ात जन्म दिला. आता ३१ वर्षीय मार्क हे पिता बनले आहेत. मुलीचे वजन ७ पौंड ७ औंस आहे. ही बातमी आज फेसबुकवर आली. त्यात मार्क, त्यांची पत्नी व कन्या मॅक्झिमा यांचे छायाचित्र आहे, त्याबरोबर मार्क व प्रिसिला यांनी मुलीला लिहिलेले पत्र आहे. ज्या जगात मॅक्झिमाला राहायचे आहे, त्याचा परिचय त्यांनी या पत्रात करून दिला आहे. आताच्या जगातील आमच्या पिढीची क्षमता मोठी आहे. व्यक्तिगत शिक्षण, स्वच्छ ऊर्जा, लोकांना एकमेकांशी जोडणे, दारिद्रय़ निर्मूलन करणे या मार्गानी समानतेचा मार्ग अवलंबला जात आहे. लहान मुलांसाठी हे जग आनंददायी बनावे यासाठी फेसबुकचे ९९ टक्के भाग आम्ही मानवतेसाठीच्या कार्याला देत आहोत, या समभागांची किंमत ४५ अब्ज डॉलर्स आहे. रोखे व विनिमय आयोगाच्या माहितीनुसार येत्या तीन वर्षांत दरवर्षी १ अब्ज डॉलर्सचे भाग विकले किंवा देणगी म्हणून दिले जातील. पत्नी चॅन झकरबर्ग यांच्या पुढील पिढीतील मानवी क्षमता व समानता वाढीसाठी मुलांवर निधी खर्च करण्याच्या योजनेस मार्क यांनी पाठिंबा दिला असून त्यासाठी ते निधी देणार आहेत. संस्थेकडील समभागांवर मार्क यांचे मतदानाचे हक्क कायम राहणार आहेत.