IRS Officer Assault Case: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील प्राप्तीकर विभागात दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारीची घटना घडली आहे. आयआरएस अधिकारी योगेंद्र मिश्रा यांनी २०१६ च्या बॅचचे अधिकारी गौरव गर्ग यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. गर्ग यांच्या तक्रारीनंतर लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गौरव गर्ग यांची पत्नी उत्तर प्रदेशमध्येच आयपीएस अधिकारी आहे. दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या घटनेचा उल्लेख करून राज्य सरकारवर टीका केली आहे.

गौरव गर्ग यांनी तक्रारीत म्हटले की, उत्तराखंडमधील काशीपूर येथे बदली झालेले सहआयुक्त योगेंद्र कुमार मिश्रा यांनी गुरुवारी (२९ मे) कार्यालयात त्यांच्याशी वाद घातला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मारहाण केली.

गर्ग पुढे म्हणाले की, १३ फेब्रुवारीपासून त्यांच्यात वाद सुरू आहे. तेव्हा मिश्रा हे लखनऊमध्ये कार्यरत होते. विभागीय क्रिकेट स्पर्धेत आपल्याला कर्णधार पद द्यावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र ही मागणी धुडकावून लावल्यानंतर मिश्रा यांनी मैदानातील खेळपट्टीवर बसून सामन्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मिश्रा यांचा छळ सुरूच होता. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर इतरांना धमकाविण्यास सुरुवात केली. ‘मला तुझ्या बहिणीच्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती आहे’, ‘काळजी घ्या, एनसीबी तुम्हाला पाहत आहे’, अशा प्रकारचे मेसेजेस मिश्रा ग्रुपमधील सहकाऱ्यांना उद्देशून टाकत असल्याचे गर्ग यांनी सांगितले.

गर्ग यांनी पुढे सांगितले की, मिश्रा यांनी अंमली पदार्थ आमच्या सामानात ठेवून कायदेशीर कचाट्यात अडकविण्याची धमकीही दिली होती. त्यांच्याविरोधात डझनभर तकारी दाखल झाल्यानंतर त्यांची उत्तराखंड येथे बदली करण्यात आली होती. २९ मे रोजी विभागीय कार्यालयात निवृत्त प्रधान मुख्य आयुक्तांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात मिश्रा यांनी घुसखोरी केली.

एफआयआरनुसार, मिश्रा यांनी शिवीगाळ करत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी पाण्याचा जग उचलून गर्ग यांच्या अंगावर पाणी फेकले. तसेच काचेचा जग फोडून त्याने गर्ग यांच्यावर हल्ला केला. गर्ग कार्यालयातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना मिश्रा यांनी त्यांना धरून त्यांचा गळा दाबला. गर्ग यांनी तक्रारीत म्हटले की, मिश्रा यांनी माझ्या चेहऱ्यावर वारंवार ठोसे मारले. तसेच माझ्या दोन पायांच्या मध्येही लाथ मारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हाणामारी सुरू असताना पोलिसांना पाचारण करण्यात आले. गर्ग यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.