अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपण्याच्या दिशेने घडामोडी सुरू आहेत. इस्लामाबाद मेमोरेंडमवर येत्या काही दिवसात स्वाक्षऱ्या होऊ शकतात असे संकेत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी दिले आहेत. करार रविवारी होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं.
करार नेमका कधी होणार यासंदर्भात ठोस तारखा निश्चित नाहीत. कराराबाबत तर्कवितर्क लढवू नका आणि खोट्या गोष्टी पसरवू नका असं बागाई यांनी म्हटलं आहे. करार दृष्टिक्षेपात आला आहे मात्र तो कधी होणार हे ठरलेलं नाही. या करारासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे आणि येत्या २४ तासात कराराला मूर्त स्वरुप येऊ शकतं असं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाह शरीफ यांनी म्हटलं होतं. मात्र इराणने रविवारी करार होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
इस्लामाबाद मेमोरेंडम हा अंतिम शांतता करार नसेल. युद्ध थांबावं यासाठी प्राथमिक उपाययोजनेचं पाऊल असेल. हॉर्मुझ व्यापारी मार्ग खुला होण्यासंदर्भात करारात उल्लेख आहे. इराणवर कोणते निर्बंध लादले जाणार, तिथल्या युरेनियम साठ्यांचं काय होणार यासंदर्भात बोलणी सुरू आहेत.
अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’वर इराणचेच नियंत्रण राहील, इराणने स्पष्ट केलंय. मात्र, दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे जगाची चिंता वाढली आहे.आंतरराष्ट्रीय कायदा इराणला या जलमार्गाचा वापर करणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याची परवानगी देत नाही, हे मान्य करत त्यांनी सांगितलं की, इराण वाटाघाटींद्वारे सेवा शुल्क वसूल करण्यासाठी एक चौकट तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
पहिल्या टप्प्यात युद्धबंदी आणि प्रादेशिक तणाव कमी करण्यावर भर दिला जाईल. सामुद्रधुनीतून व्यावसायिक जहाजांची वाहतूक विनाअडथळा सुरू राहण्यासाठी तरतुदींवर चर्चा केली जात आहे. इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा समावेश असू शकतो. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
