पुढील वर्षी अर्थात २०२४ साली देशभरात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आत्तापासूनच राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचं दिसून येत आहे. त्याअनुषंगाने काही राजकीय पक्षांनी तयारीही सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४मध्येही मोठ्या बहुमताने जिंकून येतील, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिणेतील ज्येष्ठ साहित्यिक, ‘पर्व’, ‘उत्तरकांड’ या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक एस. एल. भैरप्पा यांनी मोठं विधान केलं आहे. आपल्याला मोदींमुळेच पद्म पुरस्कार मिळाल्याचं भैरप्पा म्हणाले आहेत. तसेच, २०२४च्या निवडणुकांविषयीही त्यांनी सूचक विधान केलं आहे.
काय म्हणाले भैरप्पा?
एस एल. भैरप्पा यांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. भैरप्पा सध्या मैसूरमध्ये वास्तव्यास असून स्थानिक प्रशासनाने त्यांना ही माहिती देऊन त्यांचं अभिनंदनही केलं आहे. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना एस. एल. भैरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना त्यांच्यामुळेच हा पद्म पुरस्कार मिळाला असल्याचं नमूद केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. नाहीतर मला हा पुरस्कार मिळाला नसता”, असं भैरप्पा म्हणाले आहेत. “आजपर्यंत भारताला लाभलेल्या सरकारांपैकी मोदी सरकार हे सर्वोत्कृष्ट आहे. २०२९पर्यंत मोदींना बहुमत मिळायला हवं. त्यानंतर मोदींनी तयार केलेल्या नेत्यानंच देशाचं नेतृत्व करायला हवं”, असं भैरप्पा म्हणाले आहेत. “मी हा पुरस्कार मला दिल्यामुळे मोदी सरकारचं कौतुक करत नाहीये”, असंही त्यांनी नमूद केलं.
विश्लेषण: पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? हा पुरस्कार नाकारणारे चार भारतीय कोण होते?
BBC डॉक्युमेंटरीवर केली टीका
दरम्यान, भैरप्पा यांना सध्या वादात सापडलेल्या BBC डॉक्युमेंटरीविषयी विचारणा केली असता त्यांनी या डॉक्युमेंटरीचा निषेध केला. “भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर हे केलं जात आहे. पण भारतानं ही डॉक्युमेंटरी बॅन करायला नको होती. त्याऐवजी भारतानं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेऊन प्रतिक्रिया द्यायला हवी होती. मोदींना विरोध करणारे गोध्रामधील हत्याकांडावर मात्र मूग गिळून गप्प आहेत”, असंही भैरप्पा म्हणाले.