Donald Trump Epstein Files innocence claim: जगात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या जेफ्री एपस्टीन फाईल्स संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आहे. जेफ्री याच्याशी आपला काही संबंध नसून या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष ठरविण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यात लपवण्यासारखे काहीही नाही, असे ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

मी पूर्णपणे निर्दोष

“अमेरिकन फायनान्सर (जेफ्री एपस्टीन) याच्याशी माझा काहीही संबंध नाही, याप्रकरणात मला क्लीन चिट मिळाली आहे. यात लपवण्यासारखे काहीही नाही, मला पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले आहे. काहीतरी हाती लागेल अशी त्यांची अपेक्षा होती पण घडलं बरोबर त्याच्या उलट. मी निर्दोष आहे”, असे ट्रम्प मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

एपस्टीन डेमोक्रॅटची समस्या

एपस्टीनसोबतच्या संबंधामुळे डोनाल्ड ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. समाज माध्यमं आणि अमेरिकेतही यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, एपस्टीन डेमोक्रॅट होता आणि तो डेमोक्रॅटची समस्या आहे, रिपब्लिकनची नाही, असे ट्रम्प गेल्या वर्षी म्हणाले होते. ट्रम्प यांच्यासोबत वेळ वाया घालवू नका. मला देश चालवायचा आहे, असे उत्तर त्यांनी माध्यमांना दिले होते.

जेफ्रीसोबत संबंधाचा दावा ट्रम्प यांनी काढले खोडून

जेफ्री एपस्टीन २०१६ च्या निवडणुकीत विरोध करत होता, असा आरोपही ट्रम्प यांनी केला. “खरंतर मी निवडून येऊ नये म्हणून जेफ्री माझ्या विरोधात काम करत होता”, असे ट्रम्प म्हणाले. एपस्टीन फाईल्स समोर आल्यापासून सातत्याने त्यांचे नाव समोर आले आहे. यावरुन जेफ्री आणि ट्रम्प यांच्यातील संबंधावरुन विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आरोपानंतर जेफ्रीसोबत २००० पूर्वीच संबंध तोडल्याचे स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिले आहे.

ट्रम्प आणि एपस्टीन फाईल्स

अमेरिकेच्या विधी विभागाने जेफ्री एपस्टीनशी निगडीत तीस लाखांहून अधिक कागदपत्रं, फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक केले आहेत. अलिकडे समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांच्या किमान १००० वेळा उल्लेख आढळून आला आहे. पण, न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ५,३०० फाईल्समध्ये ट्रम्प यांचे ३८,००० संदर्भ आढळून आले आहेत. यात त्यांच्या पत्नी मेलिना, फ्लोरिडा येथील मार – अ – लागो क्लब आणि ट्रम्प यांच्याशी निगडीत इतर उल्लेख आढळून आले आहेत.