वृत्तसंस्था, लंडन

हंगेरी-ब्रिटनचे नागरिकत्व असलेले कादंबरीकार डेव्हिड सलाॅय यांच्या ‘फ्लेश’ या कादंबरीला साहित्य जगतातील परमोच्च मानल्या जाणाऱ्या बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले. ‘फ्लेश’ कादंबरी यंदाच्या लघुयादीतील सर्वार्थाने अग्रेसर आणि गडद असली, तरी वाचनाचे परमसुख देते, असे निवड समितीचे अध्यक्ष राॅडी डाॅयल यांनी नमूद केले.

तब्बल दोन दशकानंतर कादंबरी लिहून बुुकरच्या स्पर्धेत आलेल्या आणि सर्वाधिक माध्यम प्रकाशझोत लाभलेल्या किरण देसाई यांना यंदा दुसऱ्यांदा बुकर पारितोषिक मिळेल, असा कयास मांडला जात होता. मात्र ‘शरीर’ या संकल्पनेची विविध पद्धतीने कथानकाच्या माध्यमातून आठवण करून देणाऱ्या उग्र कादंबरीवर निवडसमितीने शिक्कामोर्तब केले.

या कादंबरीचा नायक, इश्तेव्हान, हंगेरी देशातून इंग्लंडमध्ये स्थलांतर करतो आणि मोठमोठे चढउतार असणारे आयुष्य जगून पुन्हा आपल्या मूळ गावी परततो. ‘फ्लेश’ ही त्याच्या काहीशा चमत्कारिक, असामान्य आणि दिशाहीन आयुष्याची गोष्ट. त्याच्या वयाच्या पंधरा वर्षापासून ती पुढे पंचवीस वर्षे चालते. डेव्हिड सलाॅय ‘फ्लेश’ या कादंबरीसह यंदा दुसऱ्यांदा नामांकित झाले होते. ‘ऑल दॅट मॅन इज’ या कथामालिका असलेल्या कादंबरीसाठी २०१६ साली त्यांची लघुयादीत निवड झाली होती.

किरण देसाई (‘द लोन्लीनेस ऑफ सोनिया ॲण्ड सनी’), ॲण्ड्र्यू मिलर (‘लॅण्ड इन द विंटर’),बेन मार्कोविट्झ (‘द रेस्ट ऑफ अवर लाईव्ह्ज’), केटी किटमुरा (‘ऑडिशन’), सुझन चाॅय (‘फ्लॅशलाईट’) यांच्यासह डेव्हिड सलाॅय यांची ‘फ्लेश’ कादंबरी बुकरच्या लघुयादीत निवडली गेली. पुरस्काराच्या दिवशी पाच तासांहून अधिक काळ समितीमधील चर्चेनंतर अंतिमत: डेव्हिड सलाॅय यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली, असे ‘बुकर’च्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले.

किरण देसाई यांना २००६ साली पहिल्यांदा बुकर पारितोषिक मिळाला. त्या यंदा दुसऱ्यांदा विजयी ठरल्या असत्या, तर दोनदा बुकर पुरस्कार मिळविणाऱ्या पाच लेखकांच्या यादीत त्यांचा समावेश झाला असता.

यंदा दीर्घयादीत समावेश झाल्यानंतर सलाॅय यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की हंगेरीमधून प्रवास सुरू करीत लंडनमध्ये पोहोचलेल्या नायकावरच मला गोष्ट लिहायची होती. सांस्कृतिक आणि आर्थिक दुभंगामुळे सद्य:स्थितीत जो युरोप बनलाय, त्याचे चित्रण कादंबरीत करायचे होते. सलाॅय यांना ५० हजार पाैंड (६६ हजार डाॅलर) इतकी पुरस्काराची रक्कम मिळेल.

लेखकाविषयी…

डेव्हिड सलाॅय (५१) या हंगेरी-ब्रिटनमधील नागरिकत्व असलेल्या लेखकाचा जन्म कॅनडाचा. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांची शैक्षणिक तसेच भाषिक वाढ झाली ती लेबनाॅन आणि लंडन शहरांत. सध्या वास्तव्य व्हिएन्नामध्ये. ‘फ्लेश’ ही सलाॅय यांची सहावी कादंबरी. एकटेपणा, वासना आणि प्रेम या तीन सूत्रांभोवती यातील नायकाचे आयुष्य या कादंबरीत चित्रित झाले आहे.

वेगळे काय?

लास्लो क्रास्नाहोरकाई या हंगेरीमधील लेखकाला महिन्यापूर्वीच साहित्यासाठीच्या नोबेलने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर बुकर पारितोषिकावर देखील हंगेरीमधील (नागरिकत्व राखून ठेवलेल्या) लेखकाने नाव कोरले. इंग्रजी भाषक जगासाठीचा म्हणून ओळखला जाणारा बुकर पहिल्यांदाच हंगेरीमधील लेखकाला मिळाला.