हरियाणा सरकारने आपले दोन महत्त्वाचे आदेश रद्द केल्याने आता राज्यातले सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत, तसंच संघाच्या शाखेतही जाऊ शकणार आहेत. हरियाणा सरकारच्या या आदेशावरुन काँग्रेस मात्र जोरदार टीका करत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी याबद्दलचे आदेश जारी केले आहेत.

१९८० साली हरियाणाच्या तत्कालीन मुख्य सचिव कार्यालयाने आदेश काढत सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास मनाई केली होती. तर अशाच प्रकारचा आदेश १९६७ सालीही काढण्यात आला होता. मात्र हे दोन्ही आदेश आता हरियाणा सरकारने रद्द केले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची मुभा मिळाली आहे

काँग्रेस मात्र हरियाणा सरकारच्या या नव्या आदेशामुळे संतप्त झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला आक्षेप नोंदवला आहे. आता हरियाणाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत जाण्याची मुभा, सरकार चालवत आहात की भाजपा-संघाची शाखा? असा खोचक सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

तर काही दिवसांपूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. आक्रमक शेतकऱ्यांना लाठ्या-काठ्यांचीच भाषा कळते. शेतकऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, असं ते म्हणाले होते. त्यामुळे देशातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. आता हरियाणातल्या या नव्या नियमांमुळेही देशात विरोधक चांगलेच संतप्त झाले असणार हे निश्चित.