नव्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीत (NRC) आसाममधील ४० लाख नागरिकांना बेकायदा म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर इतरही राज्यांत ही मोहिम सरकार राबवेल. मात्र, यात राजकारण आणत याचा वापर वोट बँक म्हणून होता कामा नये, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत सरकारला उद्देशून म्हटले आहे.


सोमवारी एनसीआरचा मसुदा सादर केल्यानंतर त्यात आसाममधील तब्बल ४० लाख नागरिक घुसखोर असल्याचे दाखवण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आज संसदेतील दोन्ही सभागृहात या मुद्द्यावरुन सरकार आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु आहे. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या मोहिमेला विरोध केला आहे.

दरम्यान, आझाद राज्यसभेत याच मुद्द्यावरुन बोलताना म्हणाले, ही राष्ट्रीय नागरिक नोंदणी हा गंभीर मुद्दा असून यावर राजकारण व्हायला नको. याद्वारे खऱ्या भारतीयांना देशाबाहेर हाकलता कामा नये, कारण हा मानवी हक्कांचा मुद्दा आहे. हिंदू-मुस्लिम असा मुद्दा नाही, त्यामुळे सरकारने यावर राजकारण करु नये.

दरम्यान, लोकसभेत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करुन या स्थलांतरीतांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यात येईल असे म्हटले आहे. त्याचबरोबर आसमानंतर आता पश्चिम बंगालमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार असल्याचे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.