‘जो ना कटे आरी से, वो कटे बिहारी से.. नेहमीच दंड थोपटत स्वत:ला ताकदवान समजणाऱ्यांना बिहारने गुडघे टेकायला लावले याचा खूप आनंद होत आहे,’ टेक्सासमधील भारतीय रहिवासी अजित चौहान बिहार निवडणुकीतील महाआघाडीच्या अभूतपूर्व विजयाबद्दल बोलत होता. बिहारच्या विकासासाठी काम करणाऱ्या टेक्सासमधील एका संघटनेसाठी अजित काम करतो. त्याला विधानसभेसाठी मतदारसंघातून आमदार निवडून देण्यासाठी मतदान करता आले नाही. पण सत्तेत पुन्हा नितीशकुमार आल्याचा आनंद लपवता येत नव्हता.
पाटण्याची श्रीनी सिंह हीसुद्धा सध्या टेक्सासमध्येच आहे. लग्नानंतर काही दिवसांपूर्वीच ती येथे आली आहे. सत्तासूत्रे नितीश यांच्या हाती आल्याने तिच्या बिहार विकासाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. ती म्हणाली, नितीशकुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्या वेळी मी त्यांची व्यक्तिश: भेट घेऊन त्यांना सदिच्छा दिल्या. आज पुन्हा त्यांनीच सत्तेची खुर्ची पटकावल्याने खूप आनंद होत आहे.
बिहारच्या राजकारणात बहुतांश काळ वादग्रस्त मुख्यमंत्री म्हणून वावरणारे आणि चारा घोटाळ्यात तुरुंगात गेल्यानंतर पत्नी राबडीदेवी यांच्यामार्फत सत्ता हाकणारे लालूप्रसाद यादव यांचे यश अनेकांना रुचलेले नाही. त्यांच्या या यशाचे समर्थन न करता अनेकांनी त्याबद्दल नाराजीच व्यक्त केली होती. लंडनमधील शीतेश प्रकाश म्हणाले, ९०च्या दशकातील लालूंचे पराक्रम आम्हाला माहीत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये नितीश यांना आणि नरेंद्र मोदींना केंद्रात पाठिंबा राहील. मुंबई आयआयटीतून अभियांत्रिकीचे पदवीधर असलेले प्रकाश यांनी भाजपच्या राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरणावर टीका केली. गोमांस आणि गोमातारक्षणासारखे कालबाह्य मुद्दे घेऊन भाजपने बिहारमध्ये प्रचार केला. भाजपचा हा मूर्खपणा होता, म्हणूनच त्यांना जनतेने नाकारल्याचे ते म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुका हा केवळ देशवासीयांसाठीच चर्चेचा विषय नव्हत्या. जगातील प्रसारमाध्यमांच्या नजरा सूक्ष्मपणे रविवारी जाहीर झालेल्या निकालांवर खिळल्या होत्या. बिहारमध्ये राहून बिहारींचा विकास भले साधता आला नाही; पण परदेशात राहून बिहारच्या प्रगतीची स्वप्ने पाहणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या मनात निकालानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. आयआयटी कानपूरचा विद्यार्थी असलेला पाटण्यातील विनीत अभिषेक याला लालू यांचा विजय खटकला. महाआघाडीला मिळालेले यश अपुरे आहे, कारण लालूप्रसाद यांच्यासारखे नेते पुन्हा राजकारणात सोज्वळ म्हणून वावरतात, असे विनीत याने स्पष्ट केले.