देशातील प्रतिष्ठेच्या परीक्षा घेणाऱ्या ‘राष्ट्रीय परीक्षा संस्थेने’ (NTA) आपली कार्यपद्धती सुधारण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. NTA ने आपल्या प्रशासनात ४ ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश केला असून, तंत्रज्ञान, वित्त आणि मानव संसाधन (HR) क्षेत्रातील ३ मोठ्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. परीक्षांमध्ये पारदर्शकता, अचूकता आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या (राधाकृष्णन समिती) शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही काळातील परीक्षांमधील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. हीच चिंता दूर करण्यासाठी आणि NTA ची प्रतिमा सुधारण्यासाठी हा बदल केला जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्ही ने प्रसिद्ध केले आहे.

४ ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे धुरा

NTA मध्ये केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचा मोठा प्रशासकीय अनुभव असलेल्या ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये दोन सह सचिव (Join Secretary) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, जे ‘अतिरिक्त महासंचालक’ (Additional Director General) म्हणून काम पाहतील. यासोबतच दोन संचालक (Director) दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या अनुभवामुळे परीक्षांचे नियोजन अधिक भक्कम होईल, असा विश्वास NTA ने व्यक्त केला आहे.

या ३ महत्त्वाच्या पदांसाठी भरती

संस्थेने तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यासाठी तीन प्रमुख पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) हे अधिकारी परीक्षांची डिजिटल प्रणाली, प्रश्नपत्रिकांचे गोपनीय व्यवस्थापन, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे गैरप्रकारांवर नियंत्रण आणि सायबर सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील. मुख्य वित्त अधिकारी (CFO) यांच्यावर परीक्षांचा खर्च, हिशोब आणि कॅगच्या (CAG) नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असेल आणि महाव्यवस्थापक मानव संसाधन (GM – HR) हे अधिकारी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि नवीन मनुष्यबळ धोरणे राबवतील.

या तीनही पदांसाठी इच्छुकांना NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात आल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्ज करावा लागणार आहे. एका विशेष समितीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.

NTA मध्ये होणार मोठे बदल

केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनानुसार NTA मध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. यामध्ये प्रश्नपत्रिकांची निर्मिती आणि वाहतूक व्यवस्था सुधारणे, उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी करणे, AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार रोखणे, आणि विद्यार्थी-पालकांशी थेट व स्पष्ट संवाद साधणे या गोष्टींचा समावेश आहे.

सध्या NEET पेपरफुटी मुळे देशभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर NTA च्या या नव्या प्रयत्नांमुळे आगामी काळातील परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडतील, अशी अपेक्षा आहे.