देशात करोनाच्या दैनंदिन आकडेवारी घट होत आहे. गेल्या २४ तासात १०२ दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी देशात ३७ हजार नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल म्हणजे सोमवारी ४६ हजार रुग्ण आढळले होते. जवळपास ९ हजारांच्या फरकाने रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच मृतांच्या संख्येत देखील घट होत आहे. करोनामुळे ९०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरुन करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी निर्बंध हटवले आहेत. मात्र डेल्टा व्हेरिएंटचे नवीन संकट देशासमोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही राज्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात सोमवारी देशात ३७,५६६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ हजार ९९४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या करोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.

१७ मार्च नंतर म्हणजे १०३ दिवसानंतर करोनाची आकडेवारी ३८,००० हजाराच्या खाली आली आहे. यापूर्वी १७ मार्च रोजी ३५,८३८ करोना रुग्ण आढळले होते.

आतापर्यंत देशात ३,०३,१६,८९७ करोना रुग्ण आढळले. यापैकी २,९३,६६,६०१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ३,९७,६७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ३,९७,६३७ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात आज करोनामुळे १०१ जणांचा मृत्यू; नव्या व्हेरिएंटची धास्ती

राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. करोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे सरकारने अद्यापही सर्व निर्बंध शिथिल केलेले नाहीत. दुसऱ्या लाटेतून धडा घेतल्याने सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे.

काल सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. १० हजार ८१२ करोना रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९५.९९ टक्के इतकं आहे. तर काल सोमवारी ६ हजार ७२७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे राज्यात आज १०१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. सध्या राज्यात १ लाख १७ हजार ८७४ रुग्ण सक्रिय आहेत.