नूपुर शर्माचे समर्थन करणाऱ्याची हत्या; उदयपूरमधील घटनेनंतर तणाव

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली.

dv nupur sharma
नूपुर शर्माचे समर्थन करणाऱ्याची हत्या

पीटीआय, उदयपूर : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. उदयपूरमध्ये त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे.

कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुचाकीवरून दोघे जण आले आणि कापड मोजमापाच्या बहाण्याने त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात आल्यावर त्यांनी कन्हैयालालवर तलवारीने सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका हल्लेखोराचे नाव रियाज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याने वार केले आणि दुसऱ्या तरुणाने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण केले, असे पोलिसांनी सांगितले.

या हल्ल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर उदयपूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिकांनी आंदोलन करून रस्त्यावर जाळपोळ सुरू केली आहे. या प्रकरणानंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हवासिंह घुमारिया यांनी ६०० पोलिसांची अतिरिक्त कुमक उदयपूरमध्ये पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले असून हल्ल्याची चित्रफीत प्रसारित न करण्याचेही आवाहन केले आहे.

पाहा व्हिडीओ –

एनआयएचे पथक तपासासाठी रवाना

नवी दिल्ली : उदयपूरमधील हत्येची ही घटना म्हणजे दहशतवादी कृत्य असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए ) पथक उदयपूरला पाठविण्यात आल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिली.

देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान- विहिप

नवी दिल्ली : उदयपूरमधील हत्येची घटना म्हणजे भारताचे सार्वभौमत्व, विचारस्वातंत्र्य यांना जिहादी तत्त्वांनी दिलेले आव्हान आहे, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी या घटनेचा निषेध केला आहे. हल्लेखोरांनी जारी केलेल्या ध्वनिचित्रफीतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकावण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nupur sharma supporter tensions udaipur offensive statement murder ysh

Next Story
अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी आज रवाना; जम्मूतील तळावर कडेकोट बंदोबस्त
फोटो गॅलरी