scorecardresearch

पेगॅसस प्रकरण: ते अमेरिकी वृत्तपत्र ‘सुपारी मीडिया’चा भाग; मोदी सरकारच्या मंत्र्याचा टोला

हे वृत्त समोर आल्यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर देशद्रोहाचा आरोप केला आहे.

Nyt Pegasus report Union minister V K Singh says New York Times Supari Media

‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राने, इस्रायलने डिफेंड डील अंतर्गत भारताला गुप्तचर सॉफ्टवेअर पेगॅसस विकल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने २०१७ मध्येच क्षेपणास्त्र प्रणालीसह शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी २ अब्ज डॉलर (१५ हजार कोटी) किमतीच्या संरक्षण करारात इस्रायली पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले होते. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने स्पायवेअर खरेदी करून ते वापरण्याच्या उद्देशाने त्याची चाचणीही केली होती, असे वृत्तपत्राने केलेल्या वर्षभराच्या तपासात उघड झाले. एफबीआयला हे स्पायवेअर पाळत ठेवण्यासाठी वापरायचे होते. या वृत्तानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. स्पायवेअर वापरून बेकायदेशीर हेरगिरी करणे हा देशद्रोह असल्याचे विरोधकांनी म्हटले होते.

जगभरात या स्पायवेअरचा वापर कसा केला गेला याचा उल्लेख न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात करण्यात आला आहे. पत्रकार आणि विरोधकांना लक्ष्य करणाऱ्यासह मेक्सिको, सौदी अरेबियामधील महिला हक्क कार्यकर्त्यांच्या विरोधात त्याचा वापर करण्यात येत होता. अहवालात असेही म्हटले आहे की, इस्रायली स्पायवेअरचा वापर पत्रकार जमाल खाशोगी यांच्या विरोधातही करण्यात आला होता, ज्यांची सौदीच्या नागरिकांनी हत्या केली होती. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने नवीन करारांतर्गत पोलंड, हंगेरी आणि भारतासह अनेक देशांना पेगॅसस देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

“देशाला बिग बॉसचा शो बनवून ठेवलंय”; पेगॅसस खरेदीच्या दाव्यावरुन शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला भेट दिली होती. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच इस्रायल दौरा होता. भारताने पॅलेस्टाईन आणि इस्रायल संबंधांबाबत धोरण आखल्यानंतर ही भेट झाल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. मात्र, पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा मैत्रीपूर्ण होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसले. यामध्ये दोन्ही देशांमधील दोन अब्ज डॉलरच्या करारामध्ये शस्त्रे आणि गुप्तचर यंत्रणा खरेदीचा समावेश होता. तसेच पेगॅससचाही या व्यवहारात सहभाग होता.

त्यानंतर पेगॅसस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. जनरल विजय कुमार सिंग यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सुपारी मीडिया म्हणत त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताला उत्तर देताना, व्हीके सिंह यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. “तुम्ही न्यूयॉर्क टाइम्सवर विश्वास ठेवू शकता का? ते ‘सुपारी मीडिया’ म्हणून ओळखले जाते, असे सिंह यांनी म्हटले आहे.

हे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी मोदी सरकारवर देशद्रोहाचा आरोप केला आहे. “मोदी सरकारने आपल्या लोकशाहीच्या प्रमुख संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगसेस स्पायवेअर खरेदी केलं होतं. फोनन टॅप करून सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष, सैन्य, न्यायपालिका सर्वांना लक्ष्य केलंय. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केलाय,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी या प्रकरणावरून बराच वाद झाला आणि विरोधी पक्षांनी सरकारवर हेरगिरीचा आरोप करत संसदेत गोंधळ घातला होता. मात्र, सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते. इस्रायली स्पायवेअर पेगॅससच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची कथित हेरगिरी केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या संघटनेने पेगॅससचा वापर अनेक भारतीय राजकारणी, मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि पत्रकार यांच्या विरोधात केला गेला, असा दावा केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nyt pegasus report union minister v k singh says new york times supari media abn

ताज्या बातम्या