भारतीयांनी एखाद्या देवतेची प्रतिमा जवळ बाळगण्यात काहीही नवीन नाही. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हनुमानाची प्रतिमा जवळ बाळगत असतील तर..?
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हनुमंताची प्रतिमा खिशात ठेवतात आणि थकल्यासारखे किंवा निराश वाटले तर ती प्रतिमा पाहून प्रेरणा घेतात. स्वत: ओबामा यांनीच यूटय़ूबवरील एका मुलाखतीत हे सांगितले. ओबामा यांचा कार्यकाळ संपत असताना तरुणांशी संपर्क साधण्याकरता व्हाइट हाऊसने ही मुलाखत आयोजित केली होती.
तुम्हाला वैयक्तिकरीत्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या वस्तू कोणत्या, असा प्रश्न यूटय़ूबचे निर्माते निल्सेन यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीत विचारण्यात आला, तेव्हा ओबामा यांनी अनेक प्रतीकचिन्हे खिशातून काढली. यापैकी प्रत्येक वस्तू मी आजवर भेटलेल्या निरनिराळ्या लोकांची आठवण करून देते, असे ते म्हणाले.
ओबामा यांनी दाखवलेल्या वस्तूंमध्ये पोप फ्रान्सिस यांनी दिलेले जपमाळेचे मणी, एका भिक्षूने दिलेला बुद्धाचा छोटा पुतळा आणि हिंदू देवता हनुमंताची प्रतिमा यासह इतर वस्तूंचा समावेश होता. मी अंधश्रद्ध नसलो, तरी मी त्या नेहमी सोबत बाळगतो. या वस्तू मला अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत दीर्घ मार्गक्रमणाच्या काही आठवणी करून देतात, असे ओबामा म्हणाले.