सीरियाच्या पेचप्रसंगावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व रशियाचे समपदस्थ व्लादिमीर पुतिन यांची चर्चा झाली, पण त्यात सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या आगामी काळातील भूमिकेबाबत काहीच स्पष्ट भूमिका घेण्यात आली नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ओबामा यांनी सीरियाचे नेते बशर अल असाद हे मुले, महिला यांना ठार मारणारे रक्तपिपासू नेते आहेत असे सांगितले. तर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी, इसिसविरोधात असाद यांना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
पुतिन यांनी आमसभेत सांगितले की, सदस्यांनी जिहादी गट असलेल्या इसिसविरोधात एकत्र यावे, सीरियावर हवाई हल्ले करण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. अमेरिका व रशियाच्या अध्यक्षांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांच्या समवेत बैठकीत हस्तांदोलन केले, पण आखातातील पेचप्रसंगावर अवाक्षरही काढले नाही. पुतिन व ओबामा यांची नंतर किमान ९० मिनिटे चर्चा झाली. त्यात दोघा नेत्यांनी सामायिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली. सीरियात राजकीय स्थित्यंतराची प्रक्रिया झाली पाहिजे, असे दोन्ही नेत्यांनी मान्य केले, पण असाद यांची भूमिका त्यात काय असावी याबाबत त्यांच्यात मतभेद झाले.
सीरियाशी असहकार्य करणे म्हणजे मोठी चूक ठरेल कारण तो देश दहशतवादाशी लढत आहे. आपण दहशतवाद विरोधी आघाडी अधिक विस्तारली पाहिजे, असे मत पुतिन यांनी आमसभेतील भाषणात व्यक्त केले. आम्ही इसिसविरोधात रशिया व इराणबरोबर काम करण्यास तयार आहोत पण याचा अर्थ सीरियात असाद यांची सत्ता सदासर्वकाळ रहावी असे नाही, असे ओबामा यांनी स्पष्ट केले. असाद यांनी सीरियन लोकांना अतिरेक्यांच्या हातचे शस्त्र केले असून निरपराध मुलांवर बॅरल बॉम्ब टाकून त्यांना मारले जात आहे, अशी टीका ओबामा यांनी केली.